Pratibha Dhanorkar reaction Sarkarnama
विदर्भ

Pratibha Dhanorkar reaction : महापौर-उपमहापौरपद हुकलं; प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, 'ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनीच...' (Video)

Chandrapur: BJP Mayor Wins with Shiv Sena UBT Support, Dhanorkar Reacts : चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर-उपमहापौर विराजमान झाल्यानंतर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली.

Pradeep Pendhare

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापालिकेत बहुमताच्या जवळ असून देखील काँग्रेसला महापौर-उपमहापौरपदाची हुलकावणी बसली आहे. हे कसं झालं, कोणामुळे झालं, कसे फोन फिरवले गेले, यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसची महापौरपदाची संधी कोणामुळे गेली, यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

खासदार धानोरकर यांनी, मित्रपक्षांवर खापर फोडलं आहे. ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यांनीच भाजपला मदत केली, असे सांगताना, 'वंचित' आणि 'AIMIM' वर देखील खासदार धानोरकर यांनी निशाणा साधला.

खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) म्हणाल्या, "आमच्याकडे बहुतम होतं असं म्हणता येणार नाही. परंतु आमचा आकडा बहुमताच्या जवळचा होता. आमचे 27, जनविकास सेनेचे 03, असे 30 जण आमच्याकडे होते. आमच्याबरोबर असलेल्या मित्रपक्षाने ऐनवेळेला आम्हाला पाठिंबा दिला नाही. याशिवाय वंचित, AIMIM पक्षाने देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपला पाठिंबा दिला. मतदानावेळी यांचे काही नगरसेवक सभागृहात हजर राहिले नाहीत. यावरून, स्पष्ट दिसते की, यांचा भाजपचा पाठिंबा होता."

'राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांची स्पष्ट निर्देश होते की, बहुमताजवळ असल्याने काँग्रेसचा (Congress) महापौर झाला पाहिजे. पण वेगळं काही होत असेल, तर तटस्थ राहा. असे करून देखील आम्ही कमी झालो नाही, तर आमचा एक सदस्य वाढला. आमचे तीस सदस्य होते. त्यात एक अधिक येऊन, 31 झाले आहेत,' असे प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य चांगलंच रंगलं. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन केली. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकत, काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला.

वंचितचे दोनजण गैरहजर

चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी 34 चा बहुमताचा आकडा गाठायचा होता. या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला 31 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा 33 वर पोहोचला.

AIMIM तटस्थ

भाजपकडे सुरुवातीला 24 नगरसेवकांचे संख्याबळ होते. यामध्ये भाजपचे 23 आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचा एक नगरसेवक होता. त्यानंतर ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत आला. ठाकरेसेनेचे सहा आणि दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ 32 वर पोहोचले. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा 33 वर पोहोचला. तर AIMIM तटस्थ राहिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 31 वरच अडकले.

राऊतांच्या विधानाचा उलटफेरा...

या सत्तानाट्यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेसेना एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील, अशी जोरदार चर्चा होती. खासदार संजय राऊत यांनी सकाळीच उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करत, “कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपूर महापालिकेची सत्ता मिळू देणार नाही,” असे विधान केले होते. मात्र काही तासांतच ठाकरे सेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा होताच संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT