Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाने आता उघड संघर्षाचे स्वरूप घेतले असून, पक्षातील दोन प्रमुख गटांमध्ये थेट ‘शह-काटशह’ सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेसचे विधानसभेतील विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थक गटांनी एकमेकांविरोधात ‘लेटर बॉम्ब’ टाकत नगरसेवकांना अक्षरशः कोंडीत पकडले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक गटाने गटनेता बदलासाठी आज बैठक बोलावली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचे समर्थक महापालिकेतील गटनेते राजेश अडूर यांनी कालच तातडीची बैठक घेऊन पक्षाचा ‘व्हिप’ जारी केला. मात्र या बैठकीला 27 पैकी केवळ 11 नगरसेवकांची उपस्थिती राहिल्याने पक्षांतर्गत फूट अधिक स्पष्टपणे समोर आली आहे.
दरम्यान, दोन्ही गटांकडून कायदेशीर कारवाई आणि अपात्रतेचे थेट इशारे दिले जात असल्याने काँग्रेस (Congress) नगरसेवकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोणत्या बैठकीला हजर राहायचे आणि कोणाचा आदेश पाळायचा, या द्विधा मनःस्थितीत नगरसेवक अडकले आहेत. सध्या परिस्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, धानोरकर गटाचे सुमारे 15 नगरसेवक यवतमाळ येथील एका रिसॉर्टमध्ये असल्याचे समोर आल्याने राजकीय तापमान आणखी वाढले. त्यानंतर या गटाकडून नगरसेवकांच्या घरांवर बैठकीच्या नोटिसा लावण्यात आल्या, ज्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.
याला प्रत्युत्तर म्हणून वडेट्टीवार समर्थक गटनेते राजेश अडूर यांनी सर्व 27 नगरसेवकांना पत्र पाठवून बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच, ही बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यात सहभागी होऊ नये किंवा कोणत्याही ठरावावर स्वाक्षरी करू नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, कालच्या अधिकृत बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने दबावाचे राजकारण अधिक तीव्र झाले आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची अंतर्गत लढाई पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वीही गटनेता निवडीवरून असाच संघर्ष उफाळला होता, जो नागपूरपासून दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी वडेट्टीवार गटाला गटनेतेपद, तर धानोरकर गटाला महापौरपदाच्या उमेदवारीवर समाधान मानावे लागले होते.
मात्र अवघ्या चार महिन्यांतच पुन्हा एकदा संघर्ष पेटल्याने पक्षांतर्गत समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ पातळीवरून हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी दोन्ही गट माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या घडामोडींवर भाजपकडूनही बारकाईने लक्ष ठेवले जात असून, काँग्रेसमधील ही अंतर्गत फूट भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.