Congress News : भाजपविरोधात लढा देत बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या काँग्रेसला आता मिळालेले यश पचवणं जड जात असल्याचे चित्र आहे. श्रेयवादातून काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडले असून, त्यातील एका गटाने स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या दोन गटांपैकी एक गट थेट भाजपला सत्तेच्या अधिक जवळ नेईल किंवा त्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करतील.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी कुणाच्याही हाती बहुमत दिले नाही. काँग्रेस मित्रपक्षांना 66 पैकी ३० जागा मिळाल्या असल्या तरी बहुमत अजूनही काहीसे दूर आहे. पण भाजपच्या बलाढ्य ताकदीपुढे, लढ्यापुढे काँग्रेसने हे यश मिळवले आहे. यासाठी आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले तसेच काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
मात्र निकाल जाहीर होत असतानाच वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी विजयी उमेदवारांना आपापल्या गोटात सामावून घेतले आहे. सध्या धोटे आणि अडबाले खासदार धानोरकरांसोबत असून त्यांच्याकडे 18 नगरसेवक आहेत. आमदार वडेट्टीवार यांच्याकडे एमआयएमसह 15 नगरसेवक असल्याची माहिती आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांचा या मतदारसंघाशी थेट संबंध नसताना ते ढवळाढवळ करत असल्याच्या तक्रारी दिल्लीपर्यंत पोहोचल्या. मात्र, त्यातून कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही, असे समजते.
दरम्यान, येत्या २२ जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून त्यापूर्वी गट स्थापन करण्याचा निर्णय घेणार आहे. कुणाच्या ‘सेटिंग’मुळे भाजपला सत्तेची संधी मिळत असेल, तर त्याची जबाबदारी आमची राहणार नाही, असे सुभाष धोटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे भाजपने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असून, काँग्रेसमध्ये फूट पडल्यास त्याचा लाभ उचलण्यासाठी रणनिती आखली आहे.
एका गटाचा पाठिंबा घेऊन किंवा पाठिंबा देत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सुरुवातीला ६ नगरसेवकांसह ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असलेल्या उबाठाची स्थिती मात्र अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. महापौर पद दिल्यास भाजपचा पाठिंबा घेवू , असे उबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत उबाठाला पाठिंबा देणार नसल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी तत्काळ स्पष्ट करत गिऱ्हे यांच्या मागणीचा इन्कार केला.
काँग्रेसमध्ये फूट पडली, तरी भाजपमधील अंतर्गत अडचणी संपणार नाहीत. भाजपमध्येही आमदार जोरगेवार आणि आमदार मुनगंटीवार असे 2 गट सक्रिय आहेत. भाजपकडे मित्रपक्षासह 24 चे बळ आहे. आणखी 10 सदस्यांची त्यांना आवश्यकता आहे. वंचितचे 2 आणि 3 नगरसेवक असलेल्या जनविकास सेनेने भाजपसोबत जाण्याची शक्यता फेटाळली आहे. उबाठाला महापौर पद देणार नाही, असे आमदार मुनगंटीवार म्हणत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या फुटीवरच भाजपचा सारा खेळ अवलंबून असेल.
सत्ता स्थापनेची संधी मिळाल्यास महापौर कोणत्या गटाचा होणार, यावरून भाजपध्येही तीव्र रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसकडे 33 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. या सर्व घडामोडींवर केंद्रीय नेतृत्वाचे बारीक लक्ष असून, यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. थोडक्यात बहुमत मिळवण्यासाठी घोडेबाजार अटळ असून, तोही अभूतपूर्व पातळीवर रंगणार हे नक्की आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी मात्र आम्ही सर्व एकच आहोत असं सांगतं काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या बातमीचा इन्कार केला. काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक आहेत आणि ते व्यवस्थेसाठी वेगवेगळे ठेवले आहेत. गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेत बसेल यामध्ये कोणतेही दुमत नाही. आम्ही शेकाप सोबत आघाडी केली होती. ते देखील आमच्यासोबत आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या संख्याबळाची व्यवस्था झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.