Chandrapur News 06 Aug : चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या मुद्द्यावरून बुधवारी (५ ऑगस्ट) मोठा गदारोळ झाला. कोरमअभावी सभा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली असताना महापौर संगीता खांडेकर यांनी निर्णायक मताचा वापर करून कामकाज सुरू ठेवले.
त्यानंतर संतप्त नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सभागृहात घुसून माईक तोडत जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळाच्या वातावरणात महापौरांनी अजेंड्यावरील तीन विषय मंजूर झाल्याचे घोषित केले आणि सभा संपवली. दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार होती.
मात्र, अजेंड्यावर स्वीकृत सदस्य निवडीचा विषय समाविष्ट नसल्याने विरोधी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सभेच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे गटनेते सुरेंद्र अडबाले, भाजपचे गटनेते चंद्रशेखर रेड्डी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते राहुल विरुटकर आणि जनविकास सेनेचे गटनेते पप्पू देशमुख यांनी महापौर संगीता खांडेकर यांची भेट घेऊन हा विषय सभेत घेण्याची मागणी केली होती.
मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थक नगरसेवकांनी सभागृहाबाहेर फलक हातात घेऊन निदर्शने केली. "वारंवार नियम तोडून आमसभा घेऊ नका" आणि "नियमबाह्य ठरावांना मंजुरी देऊ नका" अशा घोषणा देत त्यांनी मनपा प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला.
विरोधकांच्या बहिष्कारामुळे सुरुवातीला कोरम पूर्ण होईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ऐनवेळी कोरम पूर्ण झाल्यानंतर महापौरांनी सभेचे कामकाज सुरू केले. यामुळे बाहेर आंदोलन करणारे नगरसेवक आक्रमक झाले. नगरसेवक पप्पू देशमुख यांच्यासह काही नगरसेवकांनी घोषणाबाजी करत थेट सभागृहात प्रवेश केला. त्यांनी माईक खेचून तोडत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला महापौरांनी अजेंड्यावरील विषय पूर्ण झाल्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलनकर्ते सभा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर गदारोळाच्या वातावरणात महापौरांनी अजेंड्यावरील तीन महत्त्वाचे विषय मंजूर झाल्याचे घोषित केले आणि तातडीने सभागृह सोडले. या घटनेमुळे चंद्रपूर महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.