Vijay Wadettiwar vs Pratibha Dhanorkar Dispute Sarkarnama
विदर्भ

Chandrapur News: चंद्रपूर महापालिकेत मोठी राजकीय घडामोड, खासदार धानोरकरांनी वडेट्टीवारांचा डाव हाणून पाडलाच; अडुरांची अखेर हकालपट्टी

Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar: चंद्रपूर महानगरपालिकेतील कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने मंगळवारी नाट्यमय वळण घेतले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 16 नगरसेवकांना एकत्रित करत गटनेते राजेश अडूर यांना बाजूला करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता.

Deepak Kulkarni

Chandrapur News: चंद्रपूर महानगरपालिकेत हाती पुरेसं संख्याबळ असतानाही अंतर्गत गटबाजीनं काँग्रेसवर सत्तास्थापनेची चालून आलेली संधी गमावण्याची वेळ आली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार वाद उफाळून आला आहे. आता प्रतिभा धानोरकरांनी वडेट्टीवार हे विदेशात असतानाच मोठी खेळी खेळली आहे.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस गटनेतेपदाच्या वादावर अखेर बुधवारी(ता.17 जून)पडदा पडला. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक असलेले सुरेंद्र अडबाले यांची महापालिकेत काँग्रेसचे गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आदेश जारी केला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने मंगळवारी नाट्यमय वळण घेतले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 16 नगरसेवकांना एकत्रित करत गटनेते राजेश अडूर यांना बाजूला करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्याचवेळी गटनेते अडूर यांनी धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांना अपात्र करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल केल्याने खळबळ उडाली होती.

काँग्रेसचे महापालिकेत 27 नगरसेवक असून त्यात धानोरकर यांनी स्वतःचे 11 आणि वडेट्टीवार गटातील 5 नगरसेवक फोडून वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटवण्यासाठी बहुमत गोळा केले होते. ही कुणकुण लागताच विजय वडेट्टीवार गटाकडूनही शनिवारी (ता.13 जून) गटनेते राजेश अडूर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक बोलावत सर्व नगरसेवकांना व्हीपही बजावला होता.

खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांनी या बैठकीला दांडी मारल्याचंही समोर आलं होतं. याचवेळी धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांनी 15 जून रोजी झालेल्या बैठकीत राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटवून सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता.

याचदरम्यान, काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोयर यांच्यासह 15 सदस्यांनी 16 जूनला विभागीय आयुक्तांकडे शपथपत्र व ठराव सादर केला होता. त्यात गटनेते बदलाची नोंद घेण्याची मागणी करण्यात आली होती.

यानंतर विभागीय आयुक्तांनी विद्यमान गटनेते राजेश अडूर यांची नोंदणी रद्द केली असून, त्यांच्या जागी खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक सुरेंद्र अडबाले यांची काँग्रेस गटनेते म्हणून अधिकृत नोंद घेण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT