Sudhir Mungantiwar Vijay Wadettiwar .jpg Sarkarnama
विदर्भ

Vidarbha Election:भाजपमध्ये मुनगंटीवारांविरोधात असंतोष तर काँग्रेसच्या गोटात वर्चस्वाची लढाई; चंद्रपूर महापालिकेत कोण बाजी मारणार?

Chandrapur Municipal Election : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ते उफाळून आले होते. जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही झाले होते. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यात दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोपाला लगाम बसला असला तरी अंतर्गत असंतोष मात्र कायम आहे.

Rajesh Charpe

Chandrapur News : चंद्रपूर भाजपमध्ये सध्या मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या विरोधात सर्व आमदार एकत्रित झाले आहेत. भाजप जिल्हाध्यक्षाच्या निवडीवरून मोठा असंतोष उफाळून आला असताना महापालिकेची निवडणूक होणार असल्याने याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर वरोरा तर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी मतदारसंघाच्या पलीकडे जात नसल्याने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे.

चंद्रपूर महापालिकेवर भाजपची सत्ता होती. 66 नगरसेवकांची ही महापालिका असून भाजपचे 36 तर काँग्रेसचे 20 निवडून आले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे या परिसरात फार काही अस्तित्व नाही. त्यामुळे येथे थेट लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच होत असते. मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांच्या जिल्हाध्यक्ष समर्थकालाही डच्चू देण्यात आला आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांची फौज मुनगंटीवार यांच्याकडेच असल्याचे सांगण्यात येते.

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना यांच्या पसंतीचा शहराध्यक्ष भाजपने दिला आहे. सोबतच मुनगंटीवार नाराज होणार नाही याचीही काळजी घेतली आहे. ग्रामीणचा अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे. भाजप पातळीवर समन्वय साधला गेला असल्याचा संदेश दिला असला तरी नेत्यांच्या मनामधून तो अद्याप दूर झालेला नाही.

चंद्रपूरमध्ये भाजपचे पाच आमदार आहेत. कागदावर आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर भाजपच सर्वाधिक सक्रिय दिसत आहे. महापालिकेची निवडणूक भाजपला जिंकणे फारसे अवघड नाही असेच चित्र चंद्रपूरचे आहे. भाजपमध्ये जो वाद आहे तोच काँग्रेसमध्ये आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यातही मतभेद आहेत.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ते उफाळून आले होते. जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही झाले होते. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यात दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोपाला लगाम बसला असला तरी अंतर्गत असंतोष मात्र कायम आहे.

यातच चंद्रपूर शहरात महापालिकेच्या निवडणुकीची धुरा कोण उचलते यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पैसे कोण लावणार, नियोजन करणार आणि जबाबदारी कोण घेणारे असे असंख्य प्रश्न आहेत.

येथेच काँग्रेसचे इच्छुक साशंक आहेत. ज्यांना महापालिकेची निवडणूक लढायची आहे त्यांना स्वबळावरच लढावी लागणार असल्याचे दिसून येते. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांची फळी, पक्षाचे सहकार्य, पाठिंबा आणि शिस्त ही भाजपची जमेची बाजू आहे. दुसरीकडे काँग्रेसचे येथेच कमजोर असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT