Soham in CEO's Office Sarkarnama
विदर्भ

Chandrapur SP News : एसपींशी झालेला संवाद सोहमला घेऊन गेला 'आयएएस'च्या खुर्चीवर!

संदीप रायपूरे

Chandrapur SP and CEO News : सायकल चालवत असताना पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बालकाशी भेट झाली. यूपीएससी परीक्षेबाबतच्या नियोजनाची तयारी व अभ्यासाबाबतच्या त्याच्या ज्ञानाने एसपी परदेशी थक्क झाले. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला अन् सोहमचे प्रचंड कौतुक झाले. (SP Ravidrasinh Pardeshi had gone to Dongarhaldi in Pombhurna taluka)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन हेसुद्धा या प्रसंगाने भारावून गेले. त्यांनी सोहमला आपल्या खुर्चीवर बसवून सन्मान केला. एसपींशी झालेला संवाद सोहमला आयएएसच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेला. एसपी रवींद्रसिंह परदेशी हे पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथे गेले होते. सकाळी ते सायकलने फेरफटका मारण्यासाठी निघाले. त्यांनी मार्गावरील एका मुलाशी सहज गप्पा मारल्या.

त्यांनी मुलाला सहजच नाव विचारलं. मी सोहम उईके आहे व आठवीत शिकतो, असे त्याने सांगितले. दरम्यान, त्यांच्यात चांगलाच संवाद रंगला. यूपीएससीच्या परीक्षेच्या नियोजनाची इत्थंभूत माहिती त्याने परदेशी यांना दिली. अभ्यास केला नाही, तर जीवनाला जंग लागतो व तो मला लागू द्यायचा नाही, असे आत्मविश्वासाचे बोल सोहम बोलला. आठ तास अभ्यास करायचा, एक तास मित्रासोबत खेळायचं अन् आठ तास मस्त झोप घ्यायची.

आठवड्यातून एक चांगला चित्रपट जरूर बघावा, ही चतुसूत्री वापरली तर आयएएस होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. एका आठवीतल्या बालकाची हुशारी बघून परदेशींनी त्याच्याशी चर्चा लांबविली. या वेळी त्यांनी आपुलकीने सोहमच्या संपूर्ण कुटुंबीयांची माहिती घेतली. त्यांनी सोहमकडून त्याच्या आई-वडिलांची माहिती जाणून घेतली. आमच्या दोन पिढ्यांत नोकरी आम्ही बघितली नाही.

मला आयएएस (IAS) होऊन परंपरा मोडायची आहे, असे तो म्हणाला. ग्रामीण भागातील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आत्मविश्वास, जीवनाकडे बघण्याचा त्याचा सकारात्मक दृष्टिकोन, यूपीएससीच्या नियोजनाची इत्थंभूत माहिती, अभ्यासाबाबतचे त्याचे मत बघून एस. पी. रवींद्रसिंह परदेशी थक्कच राहिले. त्यांचा संवाद समाजमाध्यमात वेगाने व्हायरल झाला.

जिल्हा परिषदेचे (ZP) मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सनदेखील भारावले. त्यांनी सोहम उईके व त्याच्या आई-वडिलांना चंद्रपुरातील (Chandrapur) आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. अन् काही वेळासाठी सोहमला आपल्या खुर्चीवर बसवले. त्याच्यासोबत गप्पा केल्या. त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. हा भावनिक प्रसंग बघून सोहमचे आई-वडील हळवे झाले.

यानंतर परदेशींनी सोहम व त्याच्या कुटुंबीयांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा सन्मान केला. सोहम हा अभ्यासात अतिशय हुशार आहे. शाळेत तो दरवर्षी पहिला येतो. त्याच्या ज्ञानाला जर मदत मिळाली तर त्याचे भविष्य उज्वल होऊ शकते. सोहमचे आई-वडील गरीब आहेत. मिळेल ते काम करायचे अन् आपल्या कुटुंबाचा गाडा ओढायचा. एवढेच त्यांचे काम. त्यांना सोहमच्या हुशारीची जाणीव नव्हती.

खुद्द एसपी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्याच्या हुशारीची जाणीव त्याच्या आई-वडिलांना व समाजाला करून दिली. या विद्यार्थ्याला मदतीचा हात मिळाला तर त्याचे भविष्य उज्वल होऊ शकते. एसपींशी झालेला संवाद सोहमला आयएएस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर घेऊन गेला. सोशल मीडियावर हा विषय वेगाने व्हायरल होत आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT