SDO Gondpipri Balaji Shewale. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur : कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांसाठी गोंडपिपरीच्या एसडीओने घेतला निर्णय की...

संदीप रायपूरे

Revenue Department : भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना परमेश्वराचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु काही जण आपल्या पालकांना वाऱ्यावर सोडतात. उतरत्या वयात त्यांचे पालनपोषण करीत नाहीत. त्यांच्या या व्यथा प्रचंड वेदनादायी असतात. म्हाताऱ्या आई-वडिलांना घराबाहेरही काढले जाते. अशा वेदना भोगणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरीतील एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्यासाठी एक सकारात्मक घटना घडली आहे.

गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकरीवरील मुलाने आपल्या पालकांना निर्वाहासाठी दहा हजार रुपये दरमहा देण्याचा आदेश त्यांनी काढला आहे.

हरीमन निंबाजी दुर्गे हे चेकबोरगाव येथील रहिवासी आहेत. दुर्गे यांचे वय 75 वर्षे, 70 वर्षीय पत्नी मालताबाई दुर्गे यांच्यासोबत ते चेकबोरगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. तिघेही विवाहित आहेत. त्यांचा मुलगा गमतीदास हरीमन दुर्गे शासकीय सेवक आहे. गमतीदास राजुरा तालुक्यातील आश्रमशाळेत शिक्षक आहेत. हरीमन दुर्गे यांच्याकडे कुठलेही निर्वाहाचे साधन नाही. वयोमानामुळे ते विविध आजारांनी ग्रस्त आहेत. उतारवयात पती-पत्नीला जीवन जगणे अवघड होत आहे. हरीमन यांनी आपल्या मुलाकडून आई-वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण आधिनियम 2007 च्या कलम 5 पोटकलम (1) नुसार निर्वाह भत्ता मिळण्याबाबत अर्ज दाखल केला.

ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे उपविभागीय अधिकारी हे प्रमुख असतात. त्यामुळे दुर्गे यांनी गोंडपिपरीच्या एसडीओंकडे हा अर्ज दाखल केला. उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी खात्री केली. त्यावेळी त्यांनाही धक्का बसला. मुलगा शासकीय सेवेत असतानाही उतारवयात दुर्गे यांची अवस्था त्यांना पाहवली नाही. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर शेवाळे यांनी अर्जावर आदेश दिले. शासकीय सेवेत असलेल्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या निर्वाहासाठी दरमहा दहा हजार रुपये देण्याचे आदेश त्यांनी काढले. एसडीओ शेवाळे यांच्या या आदेशांमुळे दुर्गे दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या पालकांनी आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांना उच्च वेतन, चांगली पदे मिळाल्यानंतर मुले कसे काय वाऱ्यावर सोडू शकतात, असा प्रश्न या प्रकरणाच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांत सुनावणीसाठी आलेले हे दुसरे प्रकरण असल्याचे गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी ‘सरकानामा’शी बोलताना सांगितले. यासंदर्भात त्यांनीही चिंता व्यक्त केली.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT