Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Amravati Mayor Election : चंद्रशेखर बावनकुळेंचं ऑपरेशन 'खोडके' यशस्वी; कट्टर विरोधक असलेल्या 'रवी राणांच्या' उमेदवाराला राष्ट्रवादीची मदत

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘ऑपरेशन खोडके’ला यश. कट्टर विरोधक रवी राणांच्या उमेदवाराला राष्ट्रवादीची मदत मिळाल्याने राजकारण तापलं.

Rashmi Mane

अमरावती महापालिकेच्या सत्ताकारणात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आखलेलं ‘ऑपरेशन खोडके’ यशस्वी ठरल्याचं चित्र समोर आलं आहे. कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवी राणा गटाच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसची मदत मिळाल्याने शहराच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या 17 व्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झाली असून उपमहापौरपदावर युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे यांनी बाजी मारली आहे. महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीदरम्यान अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या. महापौर आणि उपमहापौर निवडणूक केवळ आकड्यांची लढाई न राहता ती राजकीय डावपेचांची ठरली.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सचिन भेंडे यांना तब्बल 55 मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार लुबना तन्वीर यांना 16 मते मिळाली, तर बसपाचे सचिन वैद्य केवळ 3 मतांवर अडकले. या निकालातून महायुतीची ताकद आणि विरोधकांची फूट स्पष्टपणे दिसून आली.

महापालिकेत एमआयएमचे 12 नगरसेवक असताना त्यापैकी मीरा कांबळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याने एमआयएममधील एक मत फुटल्याचं उघड झालं. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याची माहिती समोर आली, ज्यामुळे राजकीय गणितं अधिकच गुंतागुंतीची झाली.

या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत सक्रिय झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महायुतीत भाजप, युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना सहभागी असली तरी युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंध तणावपूर्ण मानले जात होते. मात्र बावनकुळेंच्या शिष्टाईने खोडके दाम्पत्याचं मन वळवलं गेल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, महापौर आणि उपमहापौर पदाचा निर्णय झाला असला तरी अमरावती महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदाचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने आणि गटाच्या संख्याबळानुसार त्यांच्या दोन नगरसेवकांचा स्थायी समितीत समावेश होणार असल्याने पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT