Chandrashekhar Bawankule on Jayant Patil's Statemen : भारतीय जनता पक्षाला ओबीसींचे नेतृत्व मान्य नाही, हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून वेळोवेळी लक्षात आले आहे. ओबीसी आरक्षणाचा गुंताही त्यांनी करून ठेवला आहे. २०१९च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना त्यांनीच पराभूत केले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच दिली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (ता. ३) नागपुरात ओबीसी मेळाव्यात केले होते. (NCP is enemy of OBC. People will teach them a lesson)
जयंत पाटलांच्या या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता. ५) समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील तमाम ओबीसी जनतेला माहिती आहे की, ओबीसीच्या विरोधात कोण आहे. असे मेळावे घेऊन, वल्गना करून, खोटारडेपणा करून त्यांना काहीही साध्य करता येणार नाही. जनता भोळी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीची शत्रू आहे. जनता त्यांना धडा शिकवेल.
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पोटात एक आणि ओठांवर दुसरेच आहे. जेव्हा ओबीसी आरक्षणाचा विषय आला, तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येक बाबीला विरोध केला. अन् आता नागपुरात हे शिबिर घेतले. ही त्यांची नौटंकी आहे. त्यांना ओबीसींसोबत काही घेणेदेणे नाही.ते सत्तेमध्ये असताना ओबीसींना न्याय दिला नाही. आता २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन, असे मेळावे घेत आहेत. राष्ट्रवादी केवळ खोट प्रेम दाखवण्याचे काम करत आहे. ओबीसींचा खरा शत्रू राष्ट्रवादीच आहे, असे बावनकुळेंनी ठामपणे सांगितले.
जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, भाजपने मला दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, तीन वेळा आमदार, महाराष्ट्राचा ऊर्जामंत्री केले. तेव्हा ओबीसींवर अन्याय झाला नव्हता का? आणि एक वेळा मला ही निवडणूक लढू नका, थांबून जा, असे सांगितले तर तो अन्याय समजायचा का, असा सवाल त्यांनी केला. पद मिळाले नाही म्हणून पक्ष सोडून जाणाऱ्यांपैकी मी नाही, असेही ते म्हणाले.
त्या काळात पक्षाने मला ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली. त्यानंतर प्रदेशचे अध्यक्ष केले. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करणे, ही आमच्या पक्षाची शिस्त आहे. उठसूठ आरोप करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, भाजप असा पक्ष आहे, ज्याने पहिला ओबीसी पंतप्रधान देशाला दिला. भाजपच्या नेतृत्वात ओबीसी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आहेत.
डॉ. बबनराव तायवाडेंनी दिला होता राजीनामा..
६५ वर्षांच्या काळात ओबीसीच्या बाबतीत जी कामे शिल्लक होती, ती भाजपने केली. हंसराज अहिर यांनी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष केले. ओबीसींसाठीच फडणवीसांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद घ्यावे लागले. त्यांनीही पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानला. ओबीसींना न्याय देण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींचं स्वतंत्र मंत्रालय झालं. त्यापूर्वी फडणवीसांनी ओबीसींसाठी आंदोलन केलं होतं.
इम्पिरिकल डेटा करण्यासाठी आयोगाने ५२७ कोटी रुपये मागितले होते, पण महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) तेव्हा ते दिले नाही. शेवटी उद्विग्न होऊन राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ओबीसी आयोगाच्या पदाचा राजीनामा दिला होता. तरीही या सरकारने ओबीसींसाठी पावले उचलली नाहीत आणि आता हे आम्हाला सांगणार का, की भाजप ओबीसी विरोधी, असा सवाल आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.