Vijay Vadettivar, Chagan Bhujbal
Vijay Vadettivar, Chagan Bhujbal  Sarkarnama
विदर्भ

Video Vijay vadettivar News : नाराज असलेल्या भुजबळांना भाजपसोबत जायचे नव्हते; वडेट्टीवारांनी केला गौप्यस्फोट

Sachin Waghmare

Gadchiroli News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे भुजबळ यांनी अनेकदा महायुतीला अडचण निर्माण होईल, असे वक्तव्यही केले. त्यांनतर भुजबळ राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा असताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

छगन भुजबळ नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर ते राज्यसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. त्या राज्यसभेच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भुजबळ यांच्या नाराजीत भर पडल्याची चर्चा होती. त्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Waddetivar) यांनी या विषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्री छगन भुजबळ भाजपसोबत जाण्यास इच्छुक नव्हते, हे त्यांनी मला खासगीत सांगितले होते. मात्र, त्यांच्या मागे तपास यंत्रणा आणि इतर दबाव असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

त्यासोबतच या विषयवार बोलताना वडेट्टीवार म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अशोक चव्हाण हे देखील भाजपसोबत स्वेच्छेने गेले असण्याची शक्यता कमी आहे. कदाचित, त्यांच्यावरही तपास यंत्रणेचा आणि अनेक चौकशीच्या प्रकरणातील दबाव असल्याने ते भाजपमध्ये गेले असावेत. ज्यांची चौकशी सुरू आहे तीच मंडळी भाजपसोबत गेली आहे. भाजपने त्यातून ही फौज जमा केली असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, रविवारी वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. या रुग्णालयात सुरु असलेला भोंगळ कारभार आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधेबाबत मिळालेल्या तक्रारी याची गंभीर दखल घेत आरोग्य सेवेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी वडेट्टीवार यांनी उपस्थित अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी कानउघाडणी केली.

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. फडणवीस पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे. या रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार न मिळणे, प्रसूती रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणे, रात्रपाळी वरिष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिति, अशा समस्या आहेत. या सर्व प्रकाराकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

SCROLL FOR NEXT