Chotu Bhoyar with Sunil Kedar, Vikas Thakre, Nitin Raut and others at Devadiya Bhawan
Chotu Bhoyar with Sunil Kedar, Vikas Thakre, Nitin Raut and others at Devadiya Bhawan Sarakrnama
विदर्भ

कट्टर स्वयंसेवकाचा भाजपला जय श्रीराम, छोटू भोयर काॅंग्रेसकडून भरणार उमेदवारी अर्ज...

मंगेश मोहिते

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर व नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांनी आज मंगळवारी पक्षनेतृत्वावर तोफ डागत भाजपला जय श्रीराम केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते उद्या काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

गेल्या पाच वर्षात पक्षाला काहीही मागितले नाही. पण, मागितले नाही म्हणून पक्षाने देऊ नये आणि त्याऐवजी कोंडमारा करावा, असे नाही. हा कोंडमारा सहन करण्याचीही एक मर्यादा असते. फुग्यात हवा भरताना फुगा फुटणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. माझ्या बाबतीत पक्षनेतृत्वाने ही काळजी घेतलेली नाही, असा आरोप भोयर यांनी केला.

पक्षाने माझ्यासाठी खूप काही केले. तर मीही पक्षासाठी तेवढेच केले आहे. या पक्षामध्ये कोण आले आणि कोण गेले याच्याशी पक्षनेतृत्वाला काही घेणेदेणेच राहिलेले नाही. एक छोटू भोयर निघाला, तर १०८ नगर सेवक आहेत. ही पक्षनेतृत्वाची मगरुरी आहे, अशी टीका भोयर यांनी केली.

डॉ. छोटू भोयर यांचे घराणे आरएसएसचे म्हणून ओळखले जाते. जनसंघापासून भोयर घराणे काम करते. त्यांचे वडील भाग संघचालक होते. तर आई भाजपची नगरसेवक राहिली आहे. सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे यांचे भाचे असलेले छोटू भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. नासुप्रचे ते विश्वस्त होते. माध्यमांशी बोलताना रवींद्र भोयर यांनी पक्षात कोंडमारा होत असल्याने भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. काँग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी देऊ केल्यामुळे प्रवेश करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेत भाजपचे केवळ सात नगरसेवक असतानापासून काम केले. गेली ३४ वर्षे खस्ता खाऊन पक्ष वाढवला. त्यानंतर काँग्रेसच्या दुसऱ्या फळीच्या नेतृत्वाला भाजपमध्ये सामावून घेण्याचे कामही आम्ही केले. येणाऱ्या प्रत्येक नवीन माणसाचे स्वागत केले. परिणामी पक्षाचा जनाधार आज प्रचंड वाढला. यात माझेही योगदान आहे. त्यानंतरही पक्षात कोंडमारा होत असेल तर थांबून काय उपयोग, असे भोयर म्हणाले. विधान परिषदेची निवडणूक स्ट्रॅटेजिकल आहे. त्यामुळे ती तशीच लढवेन. छोटू भोयर डमी उमेदवार आहे. भोयर यांना काँग्रेसमध्ये पाठवून निवडणूक अविरोध करण्याचा हा डाव आहे, असे माझ्याबद्दल पसरवले जात आहे. पण, मी डमी नाही. निकाल लागेल, त्या दिवशी कोण डमी होते हे दिसून येईल, असे सूचक वक्तव्य भोयर यांनी केले.

ही भाजपच्या पराभवाची नांदी..

भाजपमधील अनेक वर्ष राहिले छोटू भोयर यांनी आज रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. आज भाजपचे उमेदवार हे नामांकन अर्ज भरत असताना छोटू भोयर यांचा काँग्रेस प्रवेश हे भाजपच्या पराभवाची नांदी आहे, अस मत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलं

छोटू भोयर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा आहे. मात्र त्यावर निर्णय अजून झाला नाही. काही घटना या आश्चर्यचकित करणाऱ्या असतात, काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल, तो उमेदवार विजयी होईल. उमेदवाराबद्दलचा निर्णय पक्षाचा वरिष्ठ पातळीवर होईल, आम्ही सगळे तो निर्णय मान्य करून त्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू. आमची तयारी पूर्ण झाली आहे, असे नितीन राऊत म्हणाले. लवकर काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले.

छोटू भोयर हे भाजप चे जुने कार्यकर्ते आहेत. ते संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत. मात्र गेली अनेक वर्षे ते नगरसेवक पदाच्या वर जाऊ शकलेले नाही. म्हणायला एक वेळा उपमहापौर होते. ही खदखद त्यांच्या मनात होती आणि आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसला महापालिकेत 100 पेक्षा जागा मिळतील. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं, असं आवाहन त्यांनी केलं. छोटू भोयर यांच्या रूपाने काँग्रेसची ताकद नक्कीच वाढेल, मात्र त्याचा उपयोग काँग्रेस कसा करून घेते, हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT