Chief Justice Bhushan Gavai on Article 370 sarkarnama
विदर्भ

CJI Bhushan Gavai - 'कलम 370' बाबत सरन्यायाधीश गवईंनी मांडलं स्पष्टच मत; 'या' पक्षाची होणार अडचण!

CJI Gavai on Article 370 - जाणून घ्या, सरन्यायाधीश गवई यांनी नेमकं काय म्हटलं आहे? ; भारतीय राज्यघटनेबाबतही विचार मांडले आहेत.

Rajesh Charpe

CJI Bhushan Gavai Clear Stand on Article 370 and Indian Constitution - काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम काढून घेतल्याने भाजपला विरोधकांकडून आजही धारेवर धरले जात आहे. काश्मीरचे नेते हे कलम रद्द करावे अशी मागणी करीत असतात. काँग्रेसने आम्ही सत्तेवर आलो तर काश्मीरला पुन्हा विशेषाधिकार बहाल केले जाईल असेही आश्वासन काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत दिले होते.

हिंदू आणि मुस्लिम असा राजकीय रंगही यास दिला जात आहे. मुस्लिमांच्या द्वेषातून भाजपने हे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा निर्णय योग्यच असल्याचे ठामपणे सांगितले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ‘एक देश एक घटना‘ ही संकल्पना मांडली आहे. घटनेनुसारच हा बदल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता काँग्रेसची मोठी अडचण झाल्याचे दिसत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधि महाविद्याल्याच्या परिसरातील संविधान पार्कचे उद्‍घाटन आज सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ३७० कलम हटवण्याचे समर्थन केले. तसेच, या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने संविधानात असलेल्या ‘एक घटना एक देश' या तरतुदींचा दाखला देऊन विरोधात आलेली याचिका फेटाळून लावल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली राज्यघटना फेडरलीझमकडे झुकणारी असली तरी ती अमेरिकेसारखी झुकणारी नाही. अमेरिकेत प्रत्येक राज्याची स्वतंत्र घटना आहे. केंद्रीय घटनेला जास्त अधिकार नाही. भारताची घटना सर्व राज्यांसाठी एकच आहे या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदेतील भाषणाचाही दाखल त्यांनी यावेळी दिला. या देशाला एकच घटना अभिप्रेत आहे असे बाबासाहेब म्हणाले होते. कुठल्या एका राज्यासाठी वेगळी राज्य घटना असू नये, असा त्यांचा आग्रह होता. त्यांचा हा निर्णय संसदेत एकमताने मान्य केला होता असेही सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या संविधान बदलावरून देशात मोठे राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्यावतीने भाजपा संविधान बदलणार असल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. दुसरीकडे आणीबाणीला ५० वर्षे झाल्याचे निमित्त साधून भाजपतर्फे काँग्रेसच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेस हाच संविधानाचा मारेकरी असल्याचा दावा केला जात आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी काश्मीर आणि संविधानावर आपले मत व्यक्त केल्याने आता याचे पडसाद भविष्यात कसे उमटतील हे पाहावे लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT