Chief Justice Bhushan Gavai Arrives in Nagpur - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नियुक्ती झाल्यानंतर भूषण गवई यांचे आज प्रथमच नागपूरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतला विभागीय आयुक्तांपासून तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह, पोलिस आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती यांच्यासह सारेच उपस्थित होते. नागपूर विमानतळावर स्वागत करून सर्वांनी सरन्यायधीशांच्या प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्यानंतर भूषण गवई हे जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागाताला एकही प्रमुख अधिकारी गेला नव्हता. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात स्वत: भूषण गवई यांनी याकडे लक्ष वेधून नाराजीही व्यक्त केली होती.
प्रोटोकॉलचे पालन करावे याचा मी आग्रह धरत नाही, इतक्या किरकोळ बाबींकडेमध्ये पडायचे नाही. मात्र माझ्या जागी कोणी दुसरा असता तर राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२चा वापर केला असता. या अनुच्छेदानुसार कोणाही व्यक्तीला न्यायालयात उभे करता येते याकडे लक्ष वेधून त्यांनी एकप्रकारे प्रशासनाला इशाराच दिला होता.
त्यानंतर त्यांनी जे झाले ते मी कळवले, प्रोटकॉलबाबात माझी नाराजी नाही असेही स्पष्ट केले. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबल उडाली होती. विरोधकांनीही राज्य शासनावर टीका करणे सुरू केली होती. याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न सुरू झाला होता. त्यानंतर भूषण गवई यांनी स्वतः हा प्रकार बंद करण्याचे सर्वच नेत्यांना ठणकावले होते.
तर या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गंभीर दखल घेतली. मुख्य सरन्यायाधीश कायमस्वरुपी राज्य अतिथी असतील अशी घोषणा केली. सोबतच कुठल्या दर्जाचे अधिकारी तसेच त्यांच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी म्हणूण कुठले अधिकारी स्वागताला उपस्थित राहतील याचा आदेशच काढला होता. याशिवाय व्हीआयीपींच्या प्रोटोकॉल संबंधी एक समन्वय अधिकारी नेण्याचे आदेश दिले. नागपूरमध्ये या आदेशाचे तंतोतंत पालन अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसून आले.
सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर विमानतळावर येताच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (नक्षल विरोधी अभियान), विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, कुलसचिव डॉ. रागिणी खुबाळकर आणि उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी त्यांचे स्वागत केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.