
Vijay Wadettiwar's Stand Against Hindi Imposition - हिंदीच्या सक्तीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या विरोधात एकत्रित मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. नेत्यांमध्ये या विषयावर चांगलीच खडाजंगी सुरू आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदीची सक्ती नको, ती लादल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा देऊन त्यांनी यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकराने सरुवातीला हिंदी सक्तीचा आदेश काढला होता. यास प्रचंड विरोध झाल्यानंतर तो मागे घेतला. नव्याने काढलेल्या आदेशात तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला आहे. यालाही आता सर्वत्र विरोध होऊ लागला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे गेले होते.
मात्र राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विषयावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही असेही असे सुनावले. सोबतच ०५ जुलैला या विरोधात मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनेसुद्धा मोर्चा काढला जाणार आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचा हा एकत्रित मोर्चा राहणार आहे. त्यामुळे दोन्ही भावांच्या सेना या निमित्त प्रथमच एकत्र येणार असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचाही हिंदी सक्तीला विरोध आहे. ही सक्ती केंद्र सरकारच्या आदेशावरून केली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, हिंदी सक्ती नको ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. पहिली ते पाचवी हिंदीची गरज नाही. पाचवीनंतर हिंदी भाषाचे समावेश पूर्वीपासूनच शालेय अभ्यास क्रमात आहे. त्यास आमचा विरोध नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
येत्या सोमवारपासून (ता.३०) अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. हिंदी भाषेचा वाद पेटला असल्याने अधिवेशनातही याचे पडसाद उमटणार आहेत. यातच उद्धव सेना व मनसे यांच्या मोर्चामुळे या वादात आणखीच भर पडणार असल्याचे दिसून येते. मोर्चाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची दोन्ही सेना तयारी करीत असल्याचे बोलले जाते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.