eknath shinde
eknath shinde  Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : ''संजय राठोडांवर ज्यावेळी संकटं आली, त्यावेळी काही लोकांनी हात वर केले,पण आम्ही...''

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde & Uddhav Thackeray News : महाविकास आघ़ाडी सरकारमध्ये वनमंत्री असताना संजय राठोडांवर पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.पण पुणे पोलिसांनी याप्रकरणी संजय राठोडांना क्लिनचिट देखील देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

बंजारा समाजाची‎ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या‎ पोहरादेवी येथे ५९३ कोटी रुपयांच्या‎ विकासकामाचे भूमिपूजन व संत‎ सेवालाल महाराजांचा पंचधातूच्या‎ पुतळ्याचे अनावरण तसेंच सर्वात‎ मोठ्या सेवाध्वजाची स्थापना सोहळा रविवारी (दि.१२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, पोहरागड म्हणजे पवित्र काशी आहे. इथे येण्याचं भाग्य आम्हांला मिळाले. बंजारा समाज निसर्गपूजक असून मेहनत करणारा आहे. संजय राठोड हे सातत्याने या भागातील विकासाकामांसाठी पाठपुरावा करत असतात. त्याच्याच पार्श्वभूमीवर ५९३ कोटींचा अश्वारुढ पुतळा या ठिकाणी घेतला आहे. नवी मुंबई येथे बंजारा समाजाचे बोर्ड स्थापन करणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी बंजारा समाजाला देण्याची घोषणा करत आहे.

या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन यांसह विविध नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी पोहरागड येथील पोहरादेवी जिल्हा वाशीम येथे सेवा ध्वजारोहण तसेच रोहनव नंगारा वास्तुचे ५९३ कोटीचे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.यावेळी त्यांनी वसंतराव नाईक महामंडळाला पैसे कमी पडू देणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे अशी ग्वाही देतानाच तांडा वस्ती सुधारयोजनेत चांगले रस्ते पाहिजे, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, शाळा, दवाखाना, अंगणवाडी देण्याचा निर्णय सरकार घेत आहे यांसारख्या अनेक घोषणा केल्या.

शिंदे म्हणाले, बंजारा समाजातील मुलांना यापुढे शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही. तसेच बंजारा समाजाच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. मुंबईत बंजारा समाज भवन उभं करणार आहे. बंजारा समाजाला न्याय दिला पाहिजे हीच भावना आमची आहे.तुमच्या मनातलं सरकार असून मी मुख्यमंत्री नसून तुमच्यातीलच एक सदस्यच आहे. बंजारा समाजाला आम्ही दोन्ही हातानं भरभरुन देणार आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोडांवर ज्या ज्यावेळी संकटं आली. त्यावेळी हा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. पण काही लोकांनी त्यावेळी हात वर केले. मात्र, त्या संकटकाळात मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही दोघंही राठोडांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो. सुखात सगळेच येतात पण दु:खात सोबत करणं गरजेचं असतं असंही शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.

" बंजारा समाज वाईट काळातही...''

संजय राठोड यांनी पोहरादेवी कार्यक्रमात म्हणाले, "दोन-एक वर्षांपूर्वी मला एका वाईट घटनेला सामोरे जावे लागले. या प्रकरणी मला राजीनामा ही द्यावा लागला होता. परंतु आता पुन्हा अनेक दिवसांनंतर मला मंत्रिपदाची संधी नव्या सरकारमध्ये मिळाली आहे."

"संपूर्ण बंजारा समाज वाईट काळातही माझ्या पाठीशी उभा राहिलेला होता. .यामुळेच हे सगळं मला शक्य झालं. बंजारा समाजाची संस्कृती त्यांची परंपरा अत्यंत समृध्द आहे. पोहरादेवी परिसरसाचा, यास्थळाचा कायापालट घडवून आणण्याचा ध्यास, वसा आम्हीं घेतला आहे," असंही संजय राठोड यांनी सांगितंलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT