Shweta Mahale, Vidyadhar Mahale, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

फडणवीसांचे PS अन् भाजप आमदाराभोवती 'डबल ट्रॅप' : कट्टर विरोधकच कमळाच्या वाटेवर, शिवसेनेकडूनही विरोधात तगडी फिल्डिंग

BJP News : बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, चिखलीच्या आगामी राजकीय समीकरणात श्वेता महाले, संजय गायकवाड आणि राहुल बोंद्रे यांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.

Hrishikesh Nalagune, अरुण जैन : सरकारनामा ब्युरो

मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सध्या बुलढाणा आणि चिखलीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आमदार श्वेता महाले, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे तीन चेहरे आहेत. या तिन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या राजकीय हालचालींचा थेट परिणाम चिखलीच्या आगामी राजकीय समीकरणावर होण्याची शक्यता आहे.

यात विशेष म्हणजे, आमदार श्वेता महाले यांच्यासमोर एकाच वेळी दोन राजकीय आव्हाने उभी राहत असल्याचे चित्र आहे. एका बाजूला काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. दुसरीकडे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यासाठी चिखलीत राजकीय मैदान तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे २०२९च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच चिखलीत राजकीय शह-काटशहाचे वातावरण तयार होत आहे.

बोंद्रेंचा भाजप प्रवेश निश्चित :

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची 2024 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच चर्चा सुरु होती. यापूर्वी भाजपच्याच काही नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न झाल्याचे बोलले जाते. मात्र, या चर्चेला प्रत्यक्ष प्रवेशाचे स्वरूप आले नव्हते. बोंद्रे आणि आमदार श्वेता महाले हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत बोंद्रेंना दोन वेळा पराभूत करत श्वेता महाले यांनी चिखलीच्या राजकारणात आपले स्थान मजबूत केले आहे.

निवडून आल्यानंतरही महाले यांनी बोंद्रे यांच्या अनुराधा कॉलेज संदर्भातील जमिनीच्या व्यवहारांवरून आरोप केले होते. त्यावरून बोंद्रे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. एकदा बोंद्रे विधिमंडळ आवारात दिसताच महाले यांचा पारा चढला होता. त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे 'एक गुन्हेगार' विधिमंडळ आवारात फिरतो, अशी तक्रार केली होती. यावरून महाले आणि बोंद्रेंमध्ये किती टोकाचे मतभेद आहेत, हे दिसून येते.

आता तेच राहुल बोंद्रे भाजपमध्ये येत असल्याने हा केवळ पक्षबदल न राहता चिखलीतील सध्याच्या राजकीय समीकरणांनाच आव्हान देणारी घडामोड ठरू शकते. बोंद्रेंसाठीही भाजप हा राजकीय पुनर्वसनाचा पर्याय ठरणार आहे. त्यांच्या शैक्षणिक, सहकारी संस्थांना राजकीय वरदहस्त आणि अभय मिळू शकते. त्यांच्या संस्थात्मक आणि सामाजिक प्रभावाला राजकीय व्यासपीठ मिळवून पुन्हा विधानसभेच्या राजकारणात परतण्याचा बोंद्रे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

महाले दाम्पत्याची राजकीय संमती मिळाली?

आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत. बोंद्रे यांच्या प्रवेशाला महाले दाम्पत्याचा विरोध होता. त्यामुळे बोंद्रे यांच्या प्रवेशाच्या चर्चांना स्थानिक राजकारणासोबतच मुंबईतील भाजपच्या निर्णयप्रक्रियेचीही किनार मिळाली होती. पण आता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने महाले दाम्पत्याची राजकीय संमती मिळाली आहे का? की दोघांचा विरोध बाजूला ठेवून हा प्रवेश होत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुणाल गायकवाडांसाठी चिखलीत राजकीय मैदान तयार?

दुसरीकडे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या काही महिन्यांपासून चिखलीत पक्षबांधणीला वेग दिल्याचे दिसत आहे. त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांना आगामी २०२९च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीतून मैदानात उतरवले जाऊ शकते, अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे.

या चर्चेला आधार देणाऱ्या अनेक राजकीय घडामोडीही अलीकडच्या काळात घडल्या आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात विविध राजकीय मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्याचबरोबर संधी मिळेल तेव्हा विद्यमान आमदारांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

कुणाल यांच्या वाढदिवशी शक्तिप्रदर्शन

नुकताच स्वातंत्र्यदिनी कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस झाला. त्यानंतर चिखली मतदारसंघातील धाड येथील दहीहंडी कार्यक्रमालाही कुणाल आणि संजय गायकवाड उपस्थित होते. या निमित्ताने संजय गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी चिखलीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. खुल्या जीपमधून कुणाल गायकवाड यांच्यासह मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमांपेक्षा या शक्तिप्रदर्शनाला राजकीय संदर्भ अधिक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

श्वेता महालेंसमोर दोन राजकीय आव्हाने?

चिखलीच्या राजकारणातील या दोन्ही घडामोडी एकत्र पाहिल्यास आमदार श्वेता महाले यांच्यासमोर आगामी काळात दोन वेगवेगळ्या दिशेने आव्हान उभे राहण्याची शक्यता दिसते. एका बाजूला त्यांचे जुने राजकीय प्रतिस्पर्धी राहुल बोंद्रे भाजपमध्ये येत असल्याने पक्षांतर्गत समीकरण बदलू शकते. दुसरीकडे संजय गायकवाड यांनी कुणाल गायकवाड यांना चिखलीत सक्रिय केल्याने महायुतीच्या राजकारणातच नवीन स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.

म्हणजेच, श्वेता महाले यांना विरोधकांकडूनच नव्हे, तर सत्ताधारी आघाडीतील संभाव्य राजकीय हालचालींमुळे आव्हान मिळू शकते. त्यामुळे या दोन्ही घडामोडींना सध्या चिखलीच्या २०२९च्या निवडणुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या या सर्व घडामोडी चर्चेच्या पातळीवर असल्या तरी चिखलीत आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT