BJP-Shivsena News : संजय राऊत यांच्या अग्रलेखातील विधानाचा दाखला देत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी 2029 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूका लढवू शकतात, असे विधान केले. या संदर्भात नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला, यावर असं कोण मंत्री म्हणाला? असा सवाल त्यांनी केला.
संजय शिरसाट यांचे नाव सांगताच, त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जर असं काही बोलले तरच मला विचारत जा. इतरांच्या प्रश्नांवर आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशा शब्दात फडणवीस यांनी शिरसाटांना फटकारले. शिवसेनेत केवळ एकनाथ शिंदे यांच्या मताला आणि विधानाला महत्व आहे. इतर कोण काय बोलतं? यावर मी उत्तर देत नाही, त्याला आमच्या पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी हा विषय एका वाक्यात संपवला.
मंत्री संजय शिरसाट हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याच बरोबर शिवसेना पक्षाचे प्रवक्ते देखील आहेत. राज्य, देश पातळीवरील विविध विषयावर ते माध्यमांपुढे आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात. अनेकदा त्यांच्या भूमिकेवरून महायुतीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचेही पहायला मिळाले. असाच नवा वाद शिरसाट यांनी ओढावून घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखाचा दाखला देत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. राऊत यांनी असा दावा केला की, 2029 मध्ये भाजपा शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला करून स्वबळावर निवडणूक लढवू शकते. यावर भूमिका मांडतांना शिवसेना देखील स्वबळावर निवडणूक लढवू शकते. राजकारणात असा काही बाँन्ड किंवा अॅग्रीमेंट केलेले नसते की आम्ही स्वबळावर लढणार नाही.
प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा, स्वबळावर निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढू शकतात, असे शिरसाट म्हणाले. याच त्यांच्या वक्तव्यावर नागपूरमध्ये माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलते केले.
फडणवीसांनी असं कोण मंत्री म्हणाला, असा सवाल मीडियाला केला. तेव्हा संजय शिरसाट असं म्हणाले सांगताच स्मित हास्य करत मुख्यमंत्र्यांनी मला फक्त एकनाथ शिंदे बोलले, तरच प्रश्न विचारत जा, इतरांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.