

Jalna Politics News : जालना जिल्ह्यातील परतुरचे ज्येष्ठ नेते सुरेश जेथलिया यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. सडपातळ शरीरयष्टी आणि नियमित व्यायाम करणाऱ्या सुरेश जेथलिया यांच्या अकाली जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. विधानसभा आणि विधान परिषद सदस्य त्याचप्रमाणे स्थानिक नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जात, धर्म आणि पक्षविरहित संबंध जोपासले.
विधानसभेत अपक्ष निवडणूक लढवून दिमाखात एन्ट्री करणाऱ्या सुरेश जेथलिया यांची जालना जिल्ह्याच्या राजकारणात खऱ्या अर्थाने धुरंधर अशी ओळख होती. कुठलाही राजकीय वारसा नसताना इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख अस्तित्व आणि दबदबा निर्माण केला होता. नगर परिषदेच्या राजकारणातून श्रीगणेशा केलेल्या जेथलिया यांनी विधिमंडळात प्रवेश करत आपली ताकद सिद्ध केली होती.
परतूर नगर परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांनी ही नगरपालिका कायम आपल्या ताब्यात ठेवली. अनेकदा इतर पक्षांशी तडजोडीचे धोरणे त्यांनी स्वीकारले. परतूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून प्रचंड विरोध झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि थेट शिवसेनेत प्रवेश केला. 1995 मध्ये तत्कालीन शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत जेथलिया यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला होता.
जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, पण त्यांचा कपाळी विजयाचा गुलाल लागला नाही. परंतु पक्ष नेतृत्वाने त्यांना विधान परिषदेवर घेत दिलेला शब्द पूर्ण केला. परतुर विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्याने भविष्यात आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही याचा अंदाज जेथलिया यांनी बांधला होता. नगरपरिषदेतील सत्ता आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या जेथलिया यांनी परतुरमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत थेट अपक्ष म्हणून मैदानात उतरले.
पूर्वाश्रमीच्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पुरेपूर लाभ होत उचलत त्यांनी विधानसभेत धडक देत रेकाॅर्ड केला.भाजपच्या बबनराव लोणीकर आणि काँग्रेसच्या उमेदवारांना धूळ चारल्यामुळे जेथलिया यांची संपूर्ण जिल्ह्यात तेव्हा चर्चा झाली होती. अपक्ष निवडून येत आपली ताकद सिद्ध केल्यानंतर जेथलिया पुन्हा स्वगृही म्हणजेच काँग्रेस पक्षात परतले होते. 2014 आणि 2019 मध्ये दोन्ही विधानसभा निवडणुका त्यांनी काँग्रेसचे तिकिटावर लढवल्या मात्र लोणीकर यांनी त्यांना तिसऱ्यांदा आमदार होऊ दिले नाही.
पराभवानंतरही जेथलिया काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले, त्यांनी परतुर विधानसभा मतदारसंघ आणि जालना जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला. 2024 मध्ये तिसऱ्यांदा काँग्रेसकडून त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र. महाविकास आघाडीच्या प्रयोग झाल्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली नाही. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीच्याआधी जेथलिया यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
पक्षाचे काम जोमात सुरू असतानाच अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. याचाही धक्का जेथलिया यांना बसला. यातूनही सावरत त्यांनी संघटना वाढीसाठी काम सुरू केले होते. निधनाच्या आदल्या दिवशीपर्यंत ते अगदी ठणठणीत होते. अचानक छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर डॉक्टरांना बोलवून त्यांची तपासणी करण्यात आली. औषधोपचार करून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. औषध घेऊन ते रात्री झोपले ते पुन्हा उठलेच नाही.
कुटुंबीयांनी त्यांना सकाळी उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सुरेश जेथलिया हे जालना जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. पण आता जेथलिया यांच्या अकाली एक्झिटनं परतूर मतदारसंघासह जालना जिल्ह्याचं राजकीय गणित बिघडणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.