Eknath Shinde Tweet on Ranjit Patil. Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde's Twitter Post : मुख्यमंत्र्यांनी केले डॉ. रणजित पाटलांना आमदार

Sachin Deshpande

Akola Politics : विधान परिषदेत भाजपचे माजी आमदार, तसेच माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना त्यांच्या वाढदिवशी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना माजी आमदार रणजित पाटील यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘आमदार’ करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांचे हे वैयक्तिक खाते आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या संदेशाचे मोठे अर्थ काढले जाऊ शकतात. माजी आमदार डॉ. रणजित पाटील हे पुन्हा आमदार होण्याची शक्यता वाढली आहे की, ते लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार होऊ शकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला येथील भाजप नेते डॉ. रणजित पाटील काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्याकडून पराभूत झाले. त्यापूर्वीच्या टर्मला ते राज्याचे गृहमंत्री, तसेच नगरविकास राज्यमंत्री होते. डॉ. रणजित पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांना अकोला लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याविषयीची चर्चा काँग्रेसच्या अमरावती येथील बैठकीतदेखील झाली आहे.

अकोल्यातून लोकसभेचे कोणती संभाव्य नावे आहेत, त्यात काँग्रेसच्या बैठकीत डॉ. रणजित पाटील यांच्या नावावरदेखील चर्चा रंगली आहे. काँग्रेसने धोत्रे गटाचे डॉ. रणजित सपकाळ यांच्यासह खासदारपुत्र अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार नारायण गव्हाणकर यांच्याही नावावर चर्चा झाली. काँग्रेसच्या चर्चेत भाजपाच्या अकोल्याच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा रंगली असताना आज थेट मुख्यमंत्र्यांनी डॉ. रणजित पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना थेट विधान परिषदेचे ‘आमदार’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारा आमदारांची लॉटरी केव्हा?

राज्यपाल नामनिर्देशित बारा आमदारांमध्ये डॉ. रणजित पाटील यांना घेण्यात येण्याची अनेकदा चर्चा रंगते. आता थेट एकनाथ शिंदे यांनी डॉ. रणजित पाटील यांना ‘आमदार’ म्हणून दिलेल्या शुभेच्छा संदेशामुळे राजकीय वर्तुळात भविष्यातील संकेत समजले जाऊ शकतात. 12 आमदारांचे नामनिर्देशन अद्याप बाकी असताना त्यात डॉ. पाटील यांची वर्णी लागली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चुकीने डॉ. रणजित पाटील यांना आमदार केले असेल तर ती ‘पोस्ट डिलिट’ होण्याची शक्यता आहे. पण, भाजपाच्या पराभूत आमदाराला आमदार करण्याचे कौशल्य एकनाथ शिंदे यांनी दाखविल्याची पोटदुखी पाटील गटाच्या विरोधकांना निश्चित होईल हे मात्र नक्की. अकोल्यात डॉ. रणजित पाटील यांच्या चाहत्यांसाठी ते आमदार झाले तर मोठा आनंद नक्की होईल. पण, तूर्तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. रणजित पाटील यांना आमदार म्हणून शुभेच्छा दिल्यात खऱ्या पण, त्या शुभेच्छा जोपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने आमदार, खासदार होणे दूरच राहील. पण, वाढदिवसाच्या दिवशी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार म्हणून दिलेल्या शुभेच्छा, हेही नसे थोडके.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT