BJP Vs Congress Sarkarnama
विदर्भ

Congress OBC Strategy : 'ओबीसीं'ची धास्ती, काँग्रेस खेळणार 'हे' कार्ड

Rajesh Charpe

Nagpur News : महायुती सरकारने विधानसभा निवडणूक जाहीर व्हायच्या आधी धडाधड वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळांची घोषणा करून ओबीसींना खुश करण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील बहुसंख्य आणि निर्णायक असलेल्या ओबीसींच्या प्रमुख मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे.

यातच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारी जाहिरात प्रकाशित केल्याने काँग्रेस सध्या चांगलीच अस्वस्थ झाली आहे. पक्षापासून दुरावत चाललेल्या ओबीसींमधील प्रमुख जातींना विधानसभेची उमेदवारी देऊन आपलेसे करण्याचे काँग्रेस निर्णय घेणार आहे. यात प्रामुख्याने लोकसंख्येने अधिक असलेल्या तेली आणि माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याचे समजते.

विदर्भातील ओबीसी समाज ही काँग्रेसची (Congress) एकेकाळी ताकद होती. मात्र एकाच जातीला अधिकाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे बघून विशेषतः तेली आणि माळी समाज काँग्रेसपासून दुरवला होता. तो भाजपकडे झुकला आहे. भाजपनेही तेली समाजाला प्रतिनिधित्व देऊन आपल्याकडे वळवले आहे. याचा फायदा गेल्या काही निवडणुकीत भाजपला झाला असल्याचे दिसून येते.

2014 च्या निवडणुकीत भाजपचे (BJP) 62 पैकी 40 आमदार विदर्भातून निवडून आले होते. 2019च्या निवडणुकीत ही संख्या 29वर आली. त्यामुळे भाजपचे पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे भाजपने पुन्हा आता ओबीसींकडे आपला मोर्चा वळवला आहे. प्रदेशाध्यक्ष ओबीसींना केले. मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षणाच्या वादात ओबीसी दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली.

तेली, माळी यांच्यासह ओबीसींमधील मायक्रो जातीवरही काम करणे सुरू केले. अनेकांना पक्षात समावून घेतले जात आहे. हे बघता काँग्रेसनेही तेली, कुणबी यांच्यासह माळी समाजालाही प्रतिनिधित्व देण्याचे ठरवले आहे. एकट्या नागपूर शहराचा विचार करता माळी समाजाची संख्या सुमारे अडीच लाखांच्या घरात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 40 ते 40 हजार माळी समाजाचे मतदार आहेत. हे बघता नागपूर जिल्ह्यात किमान एक मतदारसंघ माळी समाजाला द्यावा यासाठी प्रयत्न केले जात आहे.

अमरावती, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यातही असेच प्रयत्न सुरू असल्याचे समजते. याकरिता माळी समाजातील काही प्रमुख नेत्यांसोबत काँग्रेसने संपर्क साधला आहे. नागपूर शहरात कुठला मतदारसंघ माळी समाजाला देता येईल याची चाचपणी सुरू आहे. येत्या दोन दिवसात माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एखाद्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये समावेश करून बहुजन हितायचा संदेश मतदारांना दिला जाणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT