Congress and PWP Party MLA Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics : शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांचं 'भाजप' कार्यालयात आदरातिथ्य, सोबतच्या काँग्रेस आमदाराचाही सन्मान

Congress and PWP MLA News : अकोला दौऱ्यावर असलेल्या पंचायतराज समितीतील काँग्रेस आमदार संजय मेश्राम आणि शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा भाजप कार्यालयात सत्कार झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.

सरकारनामा ब्यूरो

Akola, 04 September : पंचायतराज समिती सध्या अकोल्याच्या दौऱ्यावर आहे. या समितीत असलेले उमेरडचे काँग्रेस पक्षाचे आमदार संजय मेश्राम आणि सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भाजपचे खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात काँग्रेस आणि शेकापचे आमदार कसे? अशी चर्चा रंगली आहे.

एकीकडे देशभरात भाजप आणि काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असताना अकोल्यात मात्र वेगळं चित्रं पहायला मिळालं. पंचायतराज समिती सध्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यानिमित्त अकोल्यात आलेले आमदार संजय मेश्राम आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा भाजपच्या गांधी रोडवरील आळशी संकुलातील जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला.

काँग्रेस आणि शेकापच्या आमदाराच्या सत्कारावेळी पंचायतराज समितीचे अध्यक्ष आणि भाजप आमदार संतोष दानवे, समितीचे सदस्य भाजप आमदार संजय पुराम, सदाभाऊ खोत, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष जयंत मसणे, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पंचायतराज समिती 2 सप्टेंबरपासून ४ सप्टेंबरपर्यंत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदनचे भाजप आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखालील पंचायतराज समितीत सर्वपक्षीय 28 आमदारांचा समावेश आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बॅनर आणि भाजपचे चिन्ह लावलेल्या स्टेजवर काँग्रेस आणि शेकापचा आमदार बसल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस आणि शेकापच्या आमदारांचे भाजप कार्यालयातील स्वागतामुळे महाविकास आघाडीत वाद वाढण्याची शक्यता आहे. आजच्या या सत्कारानंतर काँग्रेस आणि शेकापचे वरिष्ठ नेते यावर प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकता आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे भाजपच्या जवळ गेल्याची चर्चा आहे. कारण निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच, सांगोला नगरपालिकेची निवडणूक भाजपसोबत जाऊन लढली होती. विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला होता. मात्र, काँग्रेस आमदाराच्या भाजप कार्यालयातील सत्कारामुळे नव्या वादाची चिन्हे आहेत.

भाजप आमदार सदाभाऊ यांच्या फेसबुक पोस्टनुसार, अकोला जिल्ह्याच्या पंचायतराज समितीच्या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टी, अकोला जिल्ह्याच्या वतीने पंचायतराज समितीच्या सर्व सदस्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याचवेळी मेश्राम आणि देशमुख यांचा हा सत्कार करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT