

Indapur, 04 September : इंदापूरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र आले होते. पण, तालुक्याच्या राजकारणात आज पुन्हा धक्कादायक घडामोड घडली असून कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री पाटील आणि भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. विशेष म्हणजे गारटकरांच्या नव्या आलिशान गाडीची पूजा करून पाटील यांनी स्वतः सारथ्य करत दोघांनी इंदापूर शहरातून एकत्र फेरफटका मारला, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये असलेल्या प्रदीप गारटकरांना नुकताच पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे, तर गारटकरांच्या नव्या आलिशान गाडीची पूजाही हर्षवर्धन पाटील यांनी केली. या भेटीमागे केवळ कौटुंबीक अथवा व्यक्तिगत स्नेह आहे की भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी, अशी चर्चा रंगली आहे.
हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर यांचे राजकीय संबंध इंदापूर तालुक्यात सर्वश्रुत आहेत. एकेकाळी गारटकर हे इंदापूर शहरातील पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जात होते. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्या निवडणुकीत गारटकरांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवत पाटील यांना कडवी झुंज दिली होती. राजकारणात कोणी कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात, हे इंदापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा दिसून आले आहे.
कट्टर विरोधकही एकत्र
मागील नगरपालिका निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी आपले जुने राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी आघाडी स्थापन करून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात पॅनेल उभे केले होते. त्या निवडणुकीत पाटील-गारटकर आघाडीला यश मिळाले नाही. मात्र या निवडणुकीमुळे इंदापूरच्या राजकारणात एक महत्त्वाचा संदेश गेला एकेकाळचे कट्टर विरोधकही राजकीय गरजेनुसार एकत्र येऊ शकतात. निवडणुकीत पराभव झाला असला तरी गारटकर यांची इंदापूर शहरातील राजकीय ताकद आणि संघटनात्मक प्रभाव कायम असल्याचे दिसून आले.
गारटकरांच्या भाजप प्रवेशाने समीकरणे बदलली
नगरपालिका निवडणुकीनंतर प्रदीप गारटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे पाटील आणि गारटकर पुन्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांत गेले आहेत. त्याच काळात हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय जवळीक वाढताना दिसू लागली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात पाटील आणि भरणे एकत्र आले. एकमेकांच्या निवासस्थानी भेटी, सभांमधील एकत्र उपस्थिती, यामुळे इंदापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली...
नगरपालिका निवडणुकीत मतभेद
प्रदीप गारटकर यांचा राजकीय प्रवास पाहिला तर गारटकर हे दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक मानले जात होते. भरणे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी गारटकरांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र, इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत दोघांमध्ये मतभेद झाले आणि दोन मित्र वेगळे झाले. हे दोन्ही मित्र सध्या एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून पुढे आले आहेत.
शहरातील फेरफटका
गारटकरांच्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील जवळीक पुन्हा चर्चेत आली होती. गारटकरांनी नवीन आलिशान वाहन घेतल्यानंतर त्याच्या पूजेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्यावेळी पाटील यांनी गारटकरांना पेढा भरवून वाहनाची पूजा करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः गाडी चालवत गारटकरांसोबत इंदापूर शहरातून फेरफटका मारला, त्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.
नव्या राजकीय मैत्रीचे संकेत
हर्षवर्धन पाटील यांनी गारटकरांना भरवलेला पेढा सध्या इंदापूरच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा पेढा केवळ नव्या गाडीच्या शुभेच्छांचा होता की इंदापूरच्या राजकारणात नव्या राजकीय मैत्रीचा संकेत, अशी चर्चा रंगली आहे. पाटील आणि गारटकर वेगवेगळ्या पक्षांत असले तरी त्यांच्यातील वाढती जवळीक भविष्यातील राजकीय समीकरणांकडे इशारा करत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
...तर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याविरोधात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे तीन प्रमुख चेहरे एकत्र आले, तर इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. मंत्री भरणे यांच्याविरोधातील शक्ती निवडणुकीत विखुरली जाते, त्यामुळे आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत हे तीनही नेते एकत्र आले तर राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे हे तीनही नेते एकत्र येणार का, हा खरा प्रश्न आहे. हर्षवर्धन पाटील यांनी गारटकरांना भरवलेला हा पेढा केवळ शुभेच्छांचा होता की 2029 च्या नव्या राजकीय इनिंगची गोड सुरुवात? याचे उत्तर आगामी काळातील राजकीय घडामोडीतून मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.