Nana Patole News : अखिल भारतीय काँग्रेसचे कमेटीचे ८५वे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे २४ ते २६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नाही, असे पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. तसेच विधिमंडळ पक्षनेते पदाचाही राजीनामा दिला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी पटोले यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत दिले आहे.
याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. बैठकीसाठी सर्व राज्यांतील आणि शहरातील प्रदेश प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच सर्व प्रतिनिधींची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने सर्व प्रदेश प्रतिनिधींना वार्षिक शुल्क हजार रुपये, पक्षनिधी चारशे आणि काँग्रेस संदेशचे तीनशे असे एकूण प्रत्येक सतराशे रुपये भरण्यास सांगितले आहे. नामनियुक्त सदस्यांची सदस्य फी तीन हजार रुपये असून त्यांना एकूण चार हजार तीनशे रुपये भरायचे आहेत.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून सर्व सदस्यांनी सदस्य शुल्क १५ फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यालयात भरण्याचे आदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी काढले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यानंतर जिल्हानिहाय सुरू करण्यात आलेले ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान यावर काँग्रेसच्या अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे समजते.
बाळासाहेब थोरातांचा (Balasaheb Thorat) विरोध नाना पटोलेंना (Nana Patole) पायउतार करणार, अशी जोरदार चर्चा कॉंग्रेसच्या (Congress) गोटात सुरू झाली आहे. कॉंग्रेसमध्ये सध्या मोठे वादळ आलेले आहे. पण नाना पटोलेंचे समर्थक हे मानायला तयार नाहीत. काहीही वादळ नाहीये, अशी प्रतिक्रिया पटोलेंच्या काही समर्थकांनी दिली. काहीही झाले तरी नाना प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होणार नाहीत, असा विश्वास समर्थकांना आहे. पण वेगाने होत असलेल्या घडामोडी नानांना पद सोडावे लागेल, याकडे इशारा करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.