Nagpur News : नगर पालिका आणि नगर परिषदेत महाविकास आघाडी आणि महायुती फिस्कटली आहे. सर्वच पक्षांनी आपआपले उमेदवार उभे केले आहेत. बंडखोरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजनाचा धोका निर्माण झाला आहे. तो टाळण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घ्यावी, अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे. या विरोधात आपण पोलिस तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदारसंघातील कामठी आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या रामटेक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पालिकेतील आमच्या उमेदवारांना सर्वाधिक धमक्या येत असल्याचा दावाही कुंटे पाटील यांनी केला. धमक्या देणाऱ्यांची नावानिशी पोलिस तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगर पालिका आणि नगर परिषदांची निवडणूक आघाडीने एकत्रित लढावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसने त्यांना दाद दिली नाही. आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन टाकल्या. त्यानंतर राष्ट्रवादीने समविचारी पक्ष आणि संघटनांना एकत्रित करून निवडणूक लढण्याचे ठरवले. काही ठिकाणी स्वबळावर काही ठिकाणी मित्रपक्षांसोबत युती केली आहे. तत्पूर्वी कुंटे पाटील यांनी काँग्रेसकडून आम्हाला गद्दारी धोका असल्याचे सांगितले.गेल्या झेडपी आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी असताना आमच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काही लोकांना उभे केले होते.
यावेळी आघाडी करताना काँग्रेसने (Congress) धोका देणार नाही याची हमी द्यावी आणि सन्मानजनक जागा दिल्यास आमची आघाडीत लढण्याची तयारी असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शेवटपर्यंत आघाडीच्या नेत्यांनी आपसात बैठक घेतली नाही. शेवटी सर्वांनी आपआपल्या बळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता एका एका जागेसाठी दोन दोन डझन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
याशिवाय मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. मतविभाजनाचा धोका सर्वांनाच निर्माण झाला आहे. उद्या शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे. आमच्या उमेदवारांमुळे भाजप आणि काँग्रेसला धोका वाटत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्या यासाठी आमच्या काही उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप कुंटे पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.