Congress Party Meet at Gadchiroli Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढ्यासाठी तयार राहा

संदीप रायपूरे

Gadchiroli : देशात सत्ताधाऱ्यांकडून धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. यातूनच आता सर्व विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे. विरोधकांना संपविण्याचे हे षडयंत्र ओळखत वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. असे प्रकार हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहेत. सामान्यांचा जीव घेणारे हे सरकार आहे. आता हा नारा गावागावापर्यंत पोहचवायचा आहे, असे सांगत काँग्रेस नेते महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भाजपावर आगपाखड केलीय.

देशात लवकरच लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह अन्य प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए चारशे जागांचा टप्पा पार करेल, अशी ‘गॅरेंटी’ लोकसभेत बोलावून दाखविली होती. अशात गडचिरोलीत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकताना काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात आली. Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकीसाठी भापजचे ‘मिशन चार सौ पार’ सुरू झाले आहे. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात सामान्यांसाठी कोणकोणत्या लोकाभिमुख योजना राबविल्या, त्याचे गुणगान लोकापर्यंत पोहचविण्यासाठी गावागावातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भाजपचे अशोक नेते हे खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीची ही दुसरी टर्म आहे. यंदा कुठल्याही स्थितीत भाजपच्या खासदार, आमदारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. आता त्यांनी या जिल्ह्यात काँग्रेसला विजयश्री मिळविण्यासाठी जोर लावला आहे. गेल्या काही दिवसात गडचिरोली जिल्ह्यातील राजकारणात अजय कंकडालवार यांना त्यांनी काँग्रेसमध्ये आणले. त्यांच्या प्रवेशानेही पक्षाला मोठा फायदा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व महेंद्र ब्राम्हणवाडे हे करतात. युवा धडपडणारा नेता म्हणून त्यांनी कमी काळात आपली ओळख निर्माण केली आहे. आता ते संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत. ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ हा नारा देत त्यांनी आता निवडणुकीच्या अभियानाला सुरवात केली आहे. गडचिरोली लोकसभा व विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे याच समूहातील नेत्याची या पदावर वर्णी लागणार आहे. अशात आता गडचिरोलीत भाजप व काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी जबरजस्त शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आहे.

अलीकडेच गडचिरोली महोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जिल्ह्यात मुक्काम केला. यावेळी त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या गाथाच मांडली. गडचिरोली आता महाराष्ट्राच्या सुरुवातीच टोक ठरले असे उ्दगार त्यांनी काढले होते. अशातच मागील काळात काँग्रेसने गडचिरोलीत आंदोन करीत पालकमंत्री ‘देवेंद्र फडणवीस परत या, झेपत नसेल तर राजीनामा’ द्या अशी घोषणाबाजी केली होती. लोकसभेच्या एक-एक जागा जिंकण्यासाठी आता कमालीची रस्सीखेच बघायला मिळत आहे. अशात गडचिरोलीलाही आता खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT