Jalna MP Kalyan Kale sarkarnama
विदर्भ

Marathwada MLC Election: काँग्रेस खासदाराचा व्हिडिओ व्हायरल, चक्क महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन; निवडणूक विभाग, पोलिसांत तक्रार

Congress Vs Mahayuti: ऐन मतदानाच्या दिवशीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. कल्याण काळे यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी तातडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ करत खुलासा केला.

Jagdish Pansare

Marathwada graduate constituency : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचा एक एआय व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. ज्यामध्ये कल्याण काळे चक्क महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसतात.

ऐन मतदानाच्या दिवशीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली. कल्याण काळे यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी तातडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ करत खुलासा केला. एआयद्वारे बनवण्यात आलेला हा व्हिडिओ खोडसाळपणाने बनवण्यात आला असून राजकारणाचा स्तर किती खालावला आहे याचे हे उदाहरण असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना काँग्रेस पक्षाने आपला पाठिंबा दर्शवत पहिल्या पसंतीची मतं देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे हे देखील निवडणूक मैदानात असताना काँग्रेसने प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काळे यांना सुनावले होते

लोकसभा निवडणुकीत तुम्हाला खासदार करण्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे हे विसरलात का? तुम्हाला लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवायची नाही का? अशा शब्दात खैरे यांनी काळे यांच्या परस्पर पाठिंबा जाहीर करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला होता. तर काँग्रेसने जो उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवतो त्यालाच आमचा पाठिंबा अशी भूमिका घेतली होती.

यावरून महाविकास आघाडीत वाद असतानाच, आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कल्याण काळे यांचा हा एआय व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. कल्याण काळे यांनी तातडीने याचा खुलासा करतानाच निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच पोलिसात याबाबत लेखी तक्रार देत बनावट व्हिडिओ बनवणारे वर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

विरोधी पक्षाकडून आता अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले जात आहे. माझे AI व्हिडिओ तयार करून दिशाभूल करणारा प्रचार करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. याप्रकरणी मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही.

सर्वांना विनंती आहे की, अशा व्हिडिओंना रिपोर्ट करा आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारापासून सावध राहा , असे आवाहनही कल्याण काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT