Prakash Ambedkar : महाविकास आघाडीच्या बैठकीचे आमदार नाना पटोले यांच्या सहीचे पत्र आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देणारे पत्र काँग्रेसला पाठवले. आंबेडकरांनी पत्र पाठविल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा प्रकाश आंबेडकर यांना फोन आला आहे.
‘कॉन्फरन्स कॉल’वर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी प्रकाश आंबेडकरांचे बोलणे करून दिले. ‘वंचित’च्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. फोन कॉलवर रमेश चेन्नीथला यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आघाडी संदर्भात बोलणी करण्याचे अधिकार काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोन काँग्रेसच्या नेत्यांकडे दिलेले आहेत.
पुढच्या वेळेला महाविकास आघाडीची जी बैठक होईल, त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावे, अशी विनंती चेन्नीथला यांनी केली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची ही विनंती आंबेडकर यांनी मान्य केली आहे. मात्र ती मान्य करतानाच आंबेडकरांनी रमेश चेन्नीथला यांना महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, परिस्थिती अवगत करून दिले.
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा बांधवांचा प्रश्न पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन असेल किंवा गरीब मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल यासंदर्भात रास्त आणि योग्य भूमिका घेणे आवश्यक असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी त्यांना सांगितले. रमेश चेनीथला यांनीसुद्धा ते मान्य केले, की हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याच वेळेला आंबेडकरांनी हेही सांगितले की ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठ्यांचा प्रश्न, यासंदर्भात काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा तसा थेट संबंध आलेला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
‘वंचित’ या आंदोलनात सुरुवातीपासून आहे. हा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे हा प्रश्न आणि या संदर्भातील भूमिका स्पष्ट केल्यावरच आपल्याला पुढे जाता येईल. त्याशिवाय या ठिकाणी महाराष्ट्रातील राजकारण करता येणार नाही. रमेश चेन्नीथला यांनी हे देखील मान्य केले आहे. आगामी बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल असे आंबेडकरांनी त्यानंतर सांगितले आहे. ‘वंचित’चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ही माहिती दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आघाडीसंदर्भात बैठकी कशी घेतली, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. काँग्रेस प्रभारी म्हणतात थोरात आणि चव्हाण यांना आघाडीच्या चर्चेचे अधिकार आहेत तर मग नाना पटोले यांनी आघाडीची बैठक घेतलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडीचे मोठे राजकारण शिजत असल्याचे चित्र यावरुन समोर आले आहे. ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवित ‘आघाडीच्या चर्चेला या..’, असे आमदार नाना पटोले यांचे म्हणणारे पत्र वैयक्तिक होते की पक्षाचे असा मुद्दा आता उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.