Yashomati Thakur & Pankaja Munde.
Yashomati Thakur & Pankaja Munde. Google
विदर्भ

Amravati Yashomati Thakur : 'पंकजा मुंडेंसोबत न्याय व्हायलाच पाहिजे'

Atul Mehere

Congress Leader on BJP : पंकजा मुंडे या एका मोठ्या समाजाच्या नेत्या आहेत. त्या सक्षम महिला आहेत. भाजपच्या विचारधारेसोबत त्या अद्यापही एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत. अशा सक्षम महिलांना जपलं गेलं पाहिजे. त्यांच्यासोबत न्याय झाला पाहिजे, अशी भावना काँग्रेसच्या नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

अमरावती येथे शनिवारी (ता. 25) त्यांनी पंकजा मुंडेंच्या विषयावर भाष्य केलं. पंकजा मुंडे आणि आपण विधिमंडळातील चांगल्या सहकारी आहोत, असंही ठाकूर यांनी सांगितलं. (Congress Leader MLA Yashomati Thakur Said At Amravati BJP Should Give Justice To Pankaja Munde)

पंकजा मुंडे या आपल्या वडिलांच्या काळापासून भाजपशी एकनिष्ठ आहेत. अद्यापही त्या भाजपच्याच विचारधारेवर काम करीत आहेत. त्यामुळं भाजपनं त्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. पंकजा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रथम जेव्हा विधिमंडळात आल्या, तेव्हापासून आपण दोघी चांगल्या सहकारी आहोत. विधिमंडळातील व महाराष्ट्राच्या राजकारणातील तेव्हाचे वातावरण अत्यंत चांगले व सौहार्दपूर्ण होते, असे ठाकूर यांनी सांगितलं.

भाजपनं पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावं का, यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क असलेल्या लोकनेत्या आहेत. त्यांच्या समाजाचाही त्यांना भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळं भाजपनं त्यांना योग्य ती संधी दिली पाहिजे. महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या, त्यात चुकीचं असं काहीच नाही, असंही आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी अमरावती येथे आपल्या दौऱ्यात पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. विधिमंडळात आपल्याला बहुमत मिळाल्यास आपण पंकजा मुंडे यांनाच मुख्यमंत्री करू, असं जानकर म्हणाले होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला मुलगा मानलं होतं. त्यामुळं पंकजा मुंडे या आपल्या बहीण आहेत. बहिणीसाठी भाऊ काहीही करू शकतो, असंही जानकर यांनी नमूद केलं होतं.

पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात अमरावतीतच बोलताना भाजपचं मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, पंकजा यांच्या संदर्भात चुकीचे अर्थ काढले जातात, त्यामुळं त्यांचं नुकसान होत आहे. त्यांच्या चष्म्याच्या व्हिडिओचाही असाच अर्थ लावण्यात आला. अलीकडे त्या शिंकल्या तरी बातमी केली जाते, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला होता. प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना जवळच्या व्यक्तीनंच त्यांचा घात केल्याचं काही दिवसांपूर्वी नमूद केलं होतं.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT