Nana Patole. Sarkarnama
विदर्भ

Congress News : नानाभाऊंना भंडारा-गोंदियाबाबत एवढा ‘कॉन्फिडन्स’

Nana Patole : अंतर्गत धुसफूस माहिती असतानाही विजयाचा ठाम विश्वास

अभिजीत घोरमारे

Congress News : लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघातून काँग्रेसला अद्याप उमेदवार निश्चित करता आलेला नाही. काही नावे केवळ चर्चेत राहावी म्हणून ती काँग्रेसच्याच गोटातून पुढे केली जात आहेत. दुसरीकडे गोंदिया जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस सर्वश्रूत आहे. यानंतरही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी कचारगड येथे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पुन्हा ‘पंजा’च दिसेल, असे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर नानाभाऊंना विजयाचा एवढा ‘कॉन्फिडन्स’ कशाच्या भरवश्यावर आहे, याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि नाराज नेत्यांची एकसंघ वज्रमूठ बांधण्यात नानाभाऊ यशस्वी होतील का? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्याकडून सापत्न वागणूक देत जुन्या व वरिष्ठ कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षांवर करण्यात आला होता. काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांच्या विरोधात बंड पुकारले होते. काहींनी आपल्या पदाचा राजीनामासुद्धा दिला. प्रदेश काँग्रेस कमिटीकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले. असे असताना याप्रकरणाला थंड करण्याच्या दृष्टीकोणातून कोणत्याही विशेष हालचाली अद्याप झालेल्या नाहीत. प्रकरण तसेच लांबविण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस संघटनात्मक बांधणीसाठी कामाला लागली आहे. तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आता लोकसभेपूर्वी गोंदियात अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे समोर येऊ लागले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी हे प्रकरण शांत केले नाही तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला याचे मोठे नुकसान भोगावे लागेल, असे बोलले जात आहे. असे असले तरी नाना पटोले यांचा विश्वास अद्यापही दांडगा असल्याचे दिसत आहेत. गोंदिया काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर असे काही नसल्याचे नाना नेहमी भासवत आहेत.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस ताकदीने लढवेल असा विश्वास ही नानांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. उमेदवार निश्चित झाला नसला तरी वेळेवर दिलेला उमेदवार काँग्रेस निवडून आणू शकते, असे मत नानांचे आहे. मात्र हे सर्व करत असताना नानांना गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेला काँग्रेसचा अंतर्गत कलह लवकर सोडविणे गरजेचे आहे, हे जाणकारही प्रकर्षाने सांगू लागले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT