Nana Patole  Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : "महाराष्ट्राचा उडता पंजाब..."; काँग्रेसच्या नाना पटोलेंनी शिंदे सरकारला सुनावलं

अतुल मेहरे

Amravati News : नाशिकमधील ड्रगचे लोण अमरावतीसारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहे, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नका, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी अमरावती येथे बुधवारी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्ज तस्करी अशक्य आहे. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. ड्रगमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातून फरार करण्यात कोणी मदत केली, हे समोर येत आहे. पाटील गायब कसा झाला?त्याला सोडवण्याचा कोण प्रयत्न करत आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे.

पटोले म्हणाले, पुण्यातील ड्रग्ज तस्कर प्रकरणात योग्यवेळी ती माहिती आम्ही जाहीर करू. परंतु, तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये, असे प्रकार होऊ नयेत ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs Scam) काही कालचे नाही ते आधीपासूनचे आहे, त्याला कोणा-कोणाचा पाठिंबा आहे, हे हळूहळू बाहेर येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरू असून, अमरावती विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला आहे.

अमरावतीच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री तसेच प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार बळवंतराव वानखेडे, अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, अमरावती शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अमरावतीचे प्रभारी नाना गावंडे उपस्थित होते.

पटोले म्हणाले, कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळेल, यापेक्षा मविआच्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या भाजपला सत्तेबाहेर काढणे हेच आमचे काम आहे. तसेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहाेत, त्यांनी स्वराज्यासाठी सुरतला लुटले होते, पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतला देत आहेत. सरकारमधले लोक गुजरातचे हस्तक आहेत, हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

'असा' होणार आघाडीतील जागावाटपाचा निर्णय!

काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढत आहे. जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा (Congress) विचार पोहोचवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. उदयपूर शिबिरातील निर्णयांची अंमलबजावणी कितपत झाली, याचाही आढावा घेतला जात आहे. जागावाटपाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षाने जागा लढवावी, अशी मागणी करत असतात ते योग्यच आहे; पण मेरीटनुसार जागावाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT