Vijay Wadettiwar On Ramtek Murder. Google
विदर्भ

Nagpur Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात जातीवाद फोफावतोय; त्यातूनच होताहेत हत्या

प्रसन्न जकाते

Nagpur News : महाराष्ट्रात जातीवाद पसरविण्याचं काम सरकारकडून करण्यात येत आहे. हे विष पेरण्याचं काम अगदी तळागाळापर्यंत सुरू असल्यानं रामटेक हत्याकांडासारख्या घटना घडत आहेत. महाराष्ट्र पुरोगामी आहे. अशा घटना राज्याला न शोभणाऱ्या आहेत, असा संताप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सहभागी झाल्याने एका दलित युवकाची हत्या करण्यात आली. या वेळी झालेल्या मारहाणीत एक मुस्लिम तरुणही जखमी झाला. या घटनेबद्दल वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (Congress Leader Vijay Wadettiwar Criticized Government For Spreading Racial Hatred Resulting Ramtek Murder Like Incident in Nagpur District)

जातीच्या नावाखाली कुणाला मारहाण करणं हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. ‘तुम्ही महार आणि मुस्लिम असूनही येथे कशाला आले?’ असे म्हणून केवळ रामटेक गडमंदिर शोभायात्रेत सामील झाले म्हणून मारहाण केल्याचे पीडिताच्या वडिलांनी पोलिस जबाबात सांगितले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. नागपूर जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडाचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. या हत्येनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सात ते आठ युवकांनी केलेल्या जबर मारहाणीत विवेक विश्वनाथ खोब्रागडे (वय 21, रा. सीतापूर, देवलापार. ता. रामटेक) याचा मृत्यू झाला. विवेकचा मित्र फैजान खान यात जखमी झाला. विवेक आणि फैजान रविवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकीने रामटेक येथील प्रसिद्ध गडमंदिरात शोभायात्रा पाहायला गेले होते. यात्रा संपल्यानंतर परत येत असताना गडमंदिर मार्गावर या दोघांना मनीष भारती, जितेंद्र गिरी, सत्येंद्र गिरी व त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी अडवल्याचा आरोप आहे. ‘तुम्ही दलित आणि मुस्लिम असूनही येथे कशाला आले?’ असा सवाल त्यांनी केला. ‘तुम्ही गाडीला धडक दिली. त्याच्या नुकसानभरपाईपोटी पैसे द्या,’ अशी मागणी करत या सर्वांनी विवेक व फैजानला बेदम मारहाण केली. यात विवेकचा मृत्यू झाला.

विवेकचे वडील विश्वनाथ खोब्रागडे यांच्या तक्रारीच्या आधारे रामटेक पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. मनीष बंडूजी भारती (वय 37), जितेंद्र गजेंद्र गिरी (वय 23) आणि सत्येंद्र गजेंद्र गिरी (वय 25, सर्व रा. अंबाडा वार्ड, रामटेक) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक आशीत कांबळे करीत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT