Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : गाजावाजा करून सुरू केलेल्या महामार्गावरील खड्डेच सांगताहेत त्याची ‘समृद्धी’

Samruddhi Highway : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Atul Mehere

Vijay Wadettiwar : पंतप्रधानांना बोलवून गाजावाजा करीत उद्घाटन करण्यात आलेल्या महामार्गाचे काम किती ‘समृद्धी’मय आहे, याची साक्ष त्यावर पडलेले खड्डे देत आहेत. आतापर्यंत या महामार्गावर अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. या अपघातांवर उपायांची आवश्यकता होती. जग अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहे. समृद्धी महामार्गाच्या बाबत असे काहीच झालेले नाही. आता तर या महामार्गावर खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता समोर आली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. रस्त्यांच्या कामाची 2 हजार 400 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे, कमी किमतीची निविदा फुगविण्यात आली आहे. सत्ताधारी यातून मलिदा खाल्ल्याने रस्त्यावर खड्डे पडल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अशा कामामुळेच अनेकांचे जीव गेल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. अशा महामार्गामुळे राज्याची समृद्धी वाढण्याऐवजी लोकांचे बळी जात असल्याबद्दलही वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील सगळे हिरो झाले आहेत. मारहाणीच्या घटनेतून त्यांच्या अंगात असलेली खलनायक वृत्ती समोर येत आहे. सत्ताधारी आमदारांना कायदा मालकीचा वाटायला लागला आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांनी तरुणाला केलेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून नमूद केले.

संजय गायकवाड यांच्यावर आदिवासी महिलेची जमीन हडपल्याचा आरोप आहे. सत्तेची मस्ती आहे. पैसा अमाप आहे. पैसा जिरवून होत नसल्याने असे धंदे ते करत आहेत. आपण पत्र लिहून गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अनिल देशमुख यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यांच्यावर झालेले आरोप राजकीय होते. त्यांच्यावर अन्याय झाला होता. याबाबत तेच बोलतील असे त्यांनी सांगितले. रामदास कदम यांना उशिरा बोध झाला. ते मंत्री असताना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम राजीनामा खिशात घेऊन फिरत होते. तेव्हा भाजप आपल्याला संपवेल असे सांगण्यात येत होते. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाताना ते कोणत्या विश्वासात वावरत होते, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी भाजपला ओळखलेले नाही. यंदाची निवडणूक एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अखेरची असेल यानंतर भाजपचे चिन्ह कामळाशिवाय त्यांना पर्याय असणार नाही, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला आहे. तीन जागांबाबतीत अदलाबदल शिल्लक आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना घ्यायला तयार आहोत. पण आंबेडकरांच्या मनात नेमके काय आहे, हे आम्ही ओळखू शकत नाही. आमची बोलणी सुरू आहे. सन्मानपूर्वक जागावाटपाचा निर्णय होईल, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना केले. एकटे लढले तर सहा जागा जिंकू असे बोलले जात असेल तर यावर ‘हायकमांड’ निर्णय घेईल. पुरोगामी विचारांच्या लोकांना आंबेडकर हे महाविकास आघाडीत यावे असे वाटत आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार एका मंचावर असतील तरी ते काय बोलतील. ‘नमकहराम’ हे शब्द सुप्रिया सुळे यांच्या डोक्यात भिनले असतील. ज्यांनी सगळे दिले, त्या कुटुंबाशी बेइमानीने वागत असेल तर संबंध कसे टिकतील, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. भाजपची इच्छा होती की, पवार कुटुंबामध्ये भांडो व्हावी, त्यांची ही इच्छा पूर्ण होताना दिसत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT