Vijay Wadettiwar : बुलढाणा जिल्ह्यात 26 व 27 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अनेक भागात गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चिखली, देऊळगावराजा मार्ग गारांनी झाकला गेला. संग्रामपूर, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा तालुक्यात शेतातील गहू, हरभरा काढणीला आला होता. अवकाळी पावसामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. गारपिटीने 26 हजार 768 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. गहू, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला पिकांसह फळबागाही उद्ध्वस्त झाल्या. जिल्ह्यातील 259 गावांमधील 31 हजार 510 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. सरकार नेहमीप्रमाणे पंचनामा आणि आश्वासनांची खैरात वाटत असल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅड. जयश्री शेळके यांनी थेट मंत्रालयात गाठले.
बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी 8 तालुक्यांतील सोमवारी 26 फेब्रुवारीला रात्री अवकाळी पाऊस झाला. गारपीटदेखील झाली. यात 6 हजार 768 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तीन जनावरांचा मृत्यू झाला. मागील तीन-चार वर्षांपासून सतत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अशात आता यंदाही अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याचा मोठा फटका बळीराजाला बसला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बुलढाण्यातील शेतकऱ्यांचे दुःख घेऊन काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅड. जयश्री शेळके यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी रक्कम देण्याऐवजी नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दीड लाख रुपये अशी भरघोस मदत देऊन पाठबळ द्यावे, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर संकटांवर संकट कोसळत आहेत. मागील वर्षीच्या मदतीची रक्कम अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नाही. अशात आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. सरकार काहीच करीत नाही म्हणून शेकळे, विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदतीची मागणी करण्यासाठी पोहोचल्या. बुलढाण्यात राजकीय क्षेत्रात नाव असलेल्या अॅड. जयश्री शेळके या सातत्याने शेतकरी हितासाठी काम करीत असतात. शेळके म्हणाल्या, बुलढाणा जिल्ह्यात 26 हजार 768 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 259 गावांमधील 31 हजार 510 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा, सिंदखेडराजा, बुलढाणा, लोणार, देऊळगावराजा या आठ तालुक्यांना अवकाळीचा फटका बसला आहे.
सर्वांत जास्त नुकसान संग्रामपूर तालुक्यात झाले आहे. 8 हजार 892 हेक्टरवरील पिकांचे नुकसान येथे झाले आहे. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, संत्रा आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. एकट्या संग्रामपूर तालुक्यात तब्बल 15 हजार 322 शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. जळगाव जामोदमधील 4 हजार 488 शेतकऱ्यांना फटका बसला असून, 3 हजार 791 हेक्टरवरील पिकांना झळ पोहोचली आहे. खामगावात 512 शेतकऱ्यांचे 387 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नांदुरा तालुक्यात 1 हजार 200 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. 2 हजार 350 शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अवकाळी पावसाने चुराडा केला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील 2 हजार 918 शेतकऱ्यांच्या 2 हजार 104 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेला बुलढाणाही अवकाळीच्या तडाख्यात सापडले असून, 3 हजार 400 शेतकऱ्यांचे 2 हजार 190 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
लोणार तालुक्यात 960 शेतकऱ्यांच्या 890 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची धूळधाण झाली. देऊळगावराजा तालुक्यातील 1 हजार 570 शेतकऱ्यांच्या 2 हजार 314 हेक्टरवरील रब्बी पिके भुईसपाट झाली आहेत. जिल्ह्यातील शेडनेटधारक शेतकऱ्यांनासुद्धा या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अशात सरकारने केवळ घोषणा करून जमणार नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना ठोस मदत घ्यावी लागेल. कितीही मदत जाहीर केली तरी कमीच पडेल. तुटपुंजी रक्कम देण्याऐवजी भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे, अशी मागणी शेळके यांनी विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.