Nagpur News: काँग्रसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या अलिप्त आहेत. गेल्या काही महिन्यात ते कुठल्याच कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. अखिल ओबीसी समाजाच्या मेळाव्यापासूनही ते लांब राहिले. त्यामुळे त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ते पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याचा तर्क लावला जात आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी यास नकार दिला तर काँग्रेसच्या नेत्यांनाही यावर बसत नाही. मात्र फटकून वागत आहे. ते असे का वागत आहे असा प्रश्न काँग्रेसलाही पडला आहे.
नाना पटोले भाजपचे खासदार होते. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून काँग्रेसमध्ये परत प्रवेश घेतला होता. राहुल गांधी त्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्यास सांगितले होते. किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले होते. गोंदिया भंडाराचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांना त्यांनी लोकसभेत पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये येऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना आव्हान दिले होते. मात्र त्यांच्यासमोर पटोले यांचा निभाव लागला नाही.
पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या भंडारा जिल्ह्यात परतले. विधानसभेत निवडून आले. त्यांच्या नशिबाने महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आले. त्यांना विधानासभेचे अध्यक्ष करण्यात आले. मात्र बंडखोर वृत्तीमुळे ते अध्यक्षपदाच्या बंदिस्त खुर्चीत फार काही वेळ रमले नाहीत. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याबदल्यात त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना प्रदेशाध्यक्षपद मागून घेतले. त्यानंतर नाना पटोले यांनी संपूर्ण काँग्रेस हाती घेतली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेमुळे त्यांना आणखीच बळ मिळाले. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडण्याचे अधिकार त्यांच्या हाती आहे. यात ते यशस्वीसुद्धा झाले. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन आणखीच वाढले.
त्यांची एकाधिकारशाहीसुद्धा वाढली होती, असे काँग्रेस नेत्यांचेच म्हणणे होते. अनेकांनी दिल्लीत तक्रारी केल्या. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे कोणाचे काही चालले नाही. विधानसभेची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. लोकसभा निवडणुकीचा निकाल बघून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येतील असेच सर्वांना वाटत होते. असे झाल्यास नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. हे बघता प्रदेशाध्यक्ष या नात्याने महाविकास आघाडीतील तीन पक्षांसोबत वाटाघाटी, बोलणी आणि जागा वाटपाचा निर्णयात त्यांनी जास्तच हस्तक्षेप केला. १०० जागांवर ते अडून बसले होते. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. यासाठी पटोले जास्तीत जास्त मिळाव्या यासाठी आग्रही होते. जागा वाटपाच्या मात्र शेवटच्या आघाडीत मोठा असंतोष निर्माण झाला.
त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. नाना पटोले यांना या सर्व प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आले. निवडणुकीच्या निकालाने पटोल यांच्यासह महाविकास आघाडीला जबर धक्का बसला. संपूर्ण चित्रच पालटून गेले. आघाडीचा दारुण पराभव झाला. पराभवाचे सर्व खापर काँग्रेसने पटोले यांच्यावर फोडले. त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले.
विधिमंडळ पक्षाचे नेते होण्याची त्यांची इच्छाही काँग्रेसने पूर्ण केली नाही. त्यानंतर ते हळू हळू लांब होत गेले. आता दिसेनासे झाले आहेत. भाजपात आधीच गर्दी झाली आहे. त्यांना परत भाजपमध्ये घेण्यास अनेकांचा विरोध आहे. या उपरही भाजपात गेल्यास पदाचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपात जाऊन ते काय करणार असा प्रश्न आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्याकडे कुठलीच जबाबदारी देण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.