
Kolhapur News: उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ खुला झाल्याने चुरस वाढणार आहे. विरोधी आघाडीकडून कोणते निर्णय घेतले जातात, यावर राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहे. तरी निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी कसे चित्र असणार, याची प्रतीक्षा राहणार आहे.
राष्ट्रीय काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना यांच्यासह अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात राहतील, असे प्राथमिक चित्र या मतदारसंघात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. खुला प्रवर्गामुळे बंडखोरीची संख्या अधिक राहण्याची शक्यता असल्याने नेत्यांसमोर कसोटी लागणार आहे.
उत्तूर जिल्हा परिषद गटाची यावेळी पुनर्रचना झाली आहे. गेल्यावेळी २२ गावे या मतदारसंघात होती. आता १२ गावांचा नव्याने समावेश झाला आहे. यामुळे प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. मतदारसंघ खुला झाल्याने उमेदवारांची भाऊगर्दी कशी रोखणार, हा नेत्यांसमोरचा मोठा प्रश्न असेल
उत्तूर , भादवण, बहिरेवाडी, मडिलगे या मोठ्या मतदान संख्येच्या गावातील स्थानिक जनमत मिळविण्यासाठी प्रयत्न होतील. उत्तर विभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो; मात्र १३ वर्षे हा मतदारसंघ आपल्या गटाकडे ठेवण्यात राष्ट्रीय काँग्रेसला यश आले आहे. कधी राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन, तर त्यांच्याबरोबर युती करून उमेश आपटे यांनी विजय मिळविला. माजी सभापती वसंतराव धुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची फळी कार्यरत आहे.
या विभागातील राजकारणात विठ्ठल उत्तूरकर नव्याने उतरले आहेत. आपटे यापूर्वी दोन वेळा निवडून आले. २०१४ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धुरे एकवेळ जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी पंचायत समिती सभापती व दोन वेळा साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले. या मतदारसंघात ३४ गावांचा समावेश राहणार आहे
बहिरेवाडीपासून गजरगावपर्यंत व झुलपेवाडीपासून सोहाळेपर्यंत हा मतदारसंघ विखुरला आहे. ५१ हजार मतदारापर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.
राजकीय डावपेचावर चर्चा उत्तूर ग्रामपंचायत व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र काम केले आहे. सहा प्रभाग असलेल्या मोठ्या मतदार संख्येच्या या गावचे सरपंचपद काँग्रेसकडे व उपसरपंचपद राष्ट्रवादीकडे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही ही युती कायम राहावी, असा दबाव कार्यकर्त्यांचा आहे. जिल्हा परिषद व गोकुळ या दोन्ही संस्थांच्या सत्तेत प्रत्येक पक्षाचा एक गटप्रमुख राहावा, अशी खेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
सत्तेची वाटणी करण्यावर नेतेमंडळी कितपत संमती देतात, यावरही बरेच अवलंबून आहे. दरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे गटाने गत निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवली होती. आपटे यांच्या निधनानंतर आता आगामी निवडणुकीत या गटाच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
तांबेकर, प्रकाश बेलवडे, जनार्दन निऊंगरे, अशोक चराटी, सदानंद व्हनबट्टे, विजय सावेकर यांच्या गटांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इच्छुक असे उत्तूर गटामधून काँग्रेसकडून उमेश आपटे तर राष्ट्रवादी (अजित पवार) तर्फे वसंतराव धुरे पुन्हा रिंगणात येण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार म्हणून विठ्ठल उतूरकर यांचा नवीन चेहरा जनतेसमोर येऊ शकतो.
या गटाकडून चव्हाणवाडीचे बांधकाम व्यावसायिक प्रकाश चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे. शिंदे शिवसेनेचे संजय पाटील, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, माजी उपसभापती दीपक देसाई, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संजय येजरे, लालबावटा संघटनेतून प्रकाश कुंभार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. श्रीपती यादव यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.