Vanchit Bahujan Aghadi : कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. त्यामुळे विविध पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. अकोल्यात मात्र काँग्रेसच्या इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे. ‘नया साल, नया खासदार’ म्हणत वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोल्यातून निवडणूक लढणार आहेत.
‘वंचित’चा समावेश इंडिया आघाडीत होणार का? यावरून चर्चा सुरू असतानाच जर ‘वंचित’चा समावेश ‘इंडिया’ आघाडीत झाल्यास अकोल्याची जागा मात्र काँग्रेसला आंबेडकरांसाठी सोडावी लागणार आहे. त्यामुळे प्रचार करू की नाही? अशी द्विधा मनःस्थिती काँग्रेसच्या अनेक इच्छुकांची झाली आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पक्षातील अनेक इच्छुकांचीही भाऊगर्दी झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड राहिला आहे. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र जिल्ह्यातील राजकारणात ॲड. प्रकाश आंबेडकर हे सक्रिय झाल्यानंतर काँग्रेसच्या हातातील गड गेला.
काँग्रेसला तीन दशकांपासून येथून खासदार मिळाला नाही. भाजपला या मतदारसंघात टक्कर देण्याचा आंबेडकर यांनी प्रयत्न केला. मात्र मतविभाजन होऊन अनेकदा आंबेडकर यांचा पराभव झाला. दोनदा आंबेडकर हे काँग्रेसच्या मदतीने या मतदारसंघात खासदार झाले. लवकरच 2024 मधील लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सर्वेक्षणात धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह काँग्रेसनेही कंबर कसली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रकाश आंबेडकर यांची ‘इंडिया’ आघाडीत समावेशाबाबत चर्चा सुरू आहेत. आंबेडकर यांचा ‘इंडिया’ आघाडीत समावेश होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास काँग्रेसमधील इच्छुकांच्या इच्छेवर मात्र पाणी फेरले जाणार आहे. काँग्रेसमधील अनेक इच्छुक अकोला मतदारसंघावर दावा करताना दिसत आहेत. डॉ. अभय पाटील यांचे नाव यात आघाडीवर आहे. अभय पाटील यांची उमेदवारी गेल्या निवडणुकीत राजीनामा मंजूर न झाल्याने हुकली होती. आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळण्याची आस आहे. डॉ. पाटील यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांचाही समावेश इच्छुकांमध्ये आहे. अमानकर हे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांचा ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे प्रशांत गावंडे यांचेही नाव इच्छुकांमध्ये आघाडीवर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गावंडे यांनी नेहमी शासनदरबारी लावून धरले आहेत. अनेक वर्षांपासून त्यांची तयारी सुरू आहे.
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉ. श्रीकांत तिडके यांचाही इच्छुकांमध्ये समावेश आहे. सर्व इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. असे असले तरी या सर्वांची परिस्थिती तळ्यात-मळ्यात सारखी झाली आहे. तिकडे ‘वंचित’चा इंडिया आघाडीच्या समावेशावरून चर्चा सुरू आहे. ‘वंचित’चा समावेश ‘इंडिया’ आघाडीत झाल्यास अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडावी लागणार हे निश्चित आहे. आंबेडकर यांनी पूर्वीच तशी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्ये जिल्ह्यापासून ते राज्यस्तरापर्यंत नेत्यांमध्ये वेगवेगळी मतांतरे आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी मोठा फटका बसला. हा धोका यावेळेस टाळण्यासाठी काही वरिष्ठ नेते युतीसाठी आग्रही आहेत. काही वरिष्ठांचा विरोधदेखील आहे. ‘वंचित’च्या समावेशवरच अकोल्यातील काँग्रेस मधील इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे. तसे झाल्यास इच्छुकांच्या ‘किए कराए पे..’ पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी होत असतानाच काँग्रेसच्या इच्छुकांकडून मात्र ‘करू की नाही?’' अशी द्विधा मनःस्थिती झाली आहे. येणाऱ्या काळात नेमक्या काय घटना घडतात. अकोल्याची लढत ही तिरंगी होते की दुरंगी हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.