Yashomati Thakur on Crop Insurance Google
विदर्भ

Yashomati Thakur : शेतकऱ्यांची थट्टा होत असताना पालकमंत्री झोपलेत का?

Amar Ghatare

Amravati Political News : विदर्भातील शेतकऱ्यांची शासनानं थट्टा चालवलीय. पीकविम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या मुद्द्यावरून विदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. असं असताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील झोपलेत का, असा सवाल तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केलाय.

गुरुवारी (ता. १६) त्यांनी अमरावती येथे पीकविम्याच्या मुद्द्यावर ‘सरकारनामा’शी संवाद साधला. विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शासन भेद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Congress MLA Yashomati Thakur from Amravati District Gets Angry on Minister Chandrakant Patil on Issue of Crop Insurance)

शासनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मस्करी करणं लावलंय. आपण या मुद्द्यावर विधिमंडळात आवाज उठविणार आहोत. त्यासाठी आधीच आपण प्रश्न दाखल केलाय. बीड जिल्ह्यामध्ये पीकविमा कंपनी २४१ कोटी रुपये देत आहे. बीडमध्ये शेतकरी राहतात, मग अमरावती जिल्ह्यात काय जनावरं राहतात काय, असा संतप्त सवालही आमदार अॅड. ठाकूर यांनी केला. अमरावती जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांसाठी फक्त आठ लाख देण्यात आले आहेत, असं त्या म्हणाल्या.

पीकविम्याची ही रक्कम देत असताना अमरावतीचे पालकमंत्री काय झोपा काढतात काय, असं नमूद करीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. शासन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अजिबात गंभीर नाही. त्यामुळं आता शेतकरी सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. शासनानं शेतकऱ्यांना गृहित धरणं बंद न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भातील शेतकरी वेगळा, मराठवाड्यातील वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळा असा भेद आतापर्यंत कुणीही केला नव्हता. परंतु सध्याचं शासन असा भेद करताना दिसतंय, असा आरोपही अॅड. ठाकूर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. पीकविम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलीय. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाही. शासनानंही यासंदर्भात विमा कंपन्यांना सक्त सूचना द्यायला हव्या होत्या. परंतु शासन आपल्याच मस्तीत आहे. त्यांना शेतकऱ्यांचं काहीच घेणंदेणं नसल्याकडंही त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलन आक्रमकही झाले आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी प्रशासन कामाला लागलंय. त्यामुळं अधिकारी व शासन आक्रमक आंदोलनाची प्रतीक्षा करतंय का, असा प्रश्नही पडतो, असं आमदार अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT