Congress  Sarkarnama
विदर्भ

Nagpur Congress : 'सर्व काही ठरल्यावर मुलाखतींचा फार्स कशाला?' ; नागपुरात काँग्रेसच्या इच्छुकांमधून नाराजीचा सूर!

Rajesh Charpe

Nagpur Vidhan sabha Election and Congress : विधानसभेची निवडणूक येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे 90 टक्के जागा वाटप निश्चित झाले आहे. उमेदवारांची यादीसुद्धा जवळपास तयार आहे. कुठलेच मतभेद नाही असे दावे काँग्रेसचे नेते करीत आहेत. मात्र सर्वकाही ठरले असताना उद्या (मंगळवार) नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आधीच सर्व ठरले असेल तर मुलाखती घेण्याचे कारण काय? असा सवाल काँग्रेस इच्छुकांचा आहे.

प्रदेश काँग्रेसच्यावतीने जिल्हानिहाय निरीक्षक नेमले होते. सर्वांना इच्छुकांच्या मुलाखती घेऊन अहवाल सादर करण्याच सांगण्यात आले होते. १० ऑक्टोबर ही अंतिम तारीख यासाठी देण्यात आली होती. नागपूर शहरासाठी माजी मंत्री नसीम खान(Naseem Khan) यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते कालपर्यंत नागपूरध्ये आलेच नव्हते. त्यामुळे शेकडो इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

आता उद्या मंगळवारी नसीम खान नागपूरला येणार आहेत. सकाळी नऊ वाजतापासून रविभवन येथे विधानसभा मतदरासंघनिहाय मुलाखती घेणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकी आज मुंबईत झाल्या. काही नेते दिल्लीला जाऊन आले आहेत. उमेदवार निवडण्याची सर्व प्रक्रिया पार पडली आहे.

नागपूर जिल्ह्याचा अपवाद वेगळता इतर निरीक्षकांनी दिलेल्या मुदतीत मुलाखती घेऊन अहवाल प्रदेश काँग्रेसकडे(Congress) पाठवला आहे. नागपूरमध्ये पक्षाची प्रक्रिया पार पाडण्यात आली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. ती दूर करण्यात येत असली तरी सर्व काही ठरल्यावर मुलाखतींचा फार्स कशाला करता अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली.

नागपूरमध्ये उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये वाद झाला नाही अशी एकही निवडणूक आजवर येथे झाली नाही. महापालिका, जिल्हा परिषद असो वा विधानसभेची निवडणूकही यास अपवाद नाही. मागील महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून मोठा राडा झाला होता. नागपूरमध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यामुळे शहरात फक्त चारच विधानसभा मतदारसंघाचा निर्णय घ्यायचा आहे. मध्य, पूर्व नागपूरमध्ये सर्वाधिक चुरस आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यासाठी सोडण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT