Narendra Modi sarkarnama
विदर्भ

मोदींच्या 'नमस्ते ट्रम्प'मुळेच कोरोना पसरला ; कॉग्रेसचा पलटवार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्युरो

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील झालेल्या चर्चेला उत्तर देतांना पुन्हा एकदा काँग्रेसवर (Congress) टीका केली आहे. मोदीच्या या भाषणानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

देशात कोरोना पसरविण्यात नरेंद्र मोदींच्या ‘नमस्ते ट्रम्प’व जय शाह यांच्या ‘नमस्ते स्टंप’ तसेच तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ . हर्षवर्धन यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप डॉ. सुधीर ढोणे (Sudhir Dhone) यांनी केला आहे. मोदी यांनी लोकसभेत केलेल्या आरोपावर ढोणे यांनी पलटवार केला आहे.

ता. १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी देशात कोरोना येण्याची भीती व्यक्त करीत, त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र, ता. १९ फेब्रुवारी २०२० रोजी मोदींनी त्याबाबत एक शब्दही न बोलता चवदार लिट्टी चोखाचे जेवण केले व गरम चहा घेतल्याचे सोशल मीडियावर लिहून कोरोनाबाबत अजिबात गंभीर नसल्याचे मोदींनी दाखवून दिले होते.

ता. ५ मार्च २०२० रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर देतांना असे ट्विट केले होते की, गांधी परिवार देशाला कोरोनाची भीती दाखवित्त आहे. देशात कोरोनाची अजिबात भीती नसून, राहुल गांधी यांना जागतिक आरोग्य संघटनेपेक्षाही अधिक ज्ञान असल्याची उपरोधिक टीका केली होती. यावरून पंतप्रधान मोदी, देशाचे आरोग्य मंत्री कोरोना बाबत किती बेफिकीर व बेजबाबदार होते हे सिद्ध होत असल्याचा आरोपही डॉ. ढोणे यांनी केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या व नंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःचे नाव दिलेल्या अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमवर अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांनी ‘नमस्ते स्टंप’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमानंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. गुजरातच्या उच्च न्यायालयाने ता. १२ एप्रिल २०२० रोजी गुजरात सरकारवर यासंदर्भात टीकाही केली होती. यावरून देशात कोरोना पसरविण्यात नरेंद्र मोदींच्या ‘नमस्ते ट्रम्प’व जय शाह यांच्या ‘नमस्ते स्टंप’तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ . हर्षवर्धन यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT