Application Distribution By Congress at Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : निवडणूक लढायचीय? काँग्रेस कार्यालयात या आणि..

Atul Mehere

Maharashtra Politics : लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा असल्यास काँग्रेस कार्यालयात या आणि उमदेवारी अर्ज घेऊन जा. आश्चर्य वाटत असले तरी महाराष्ट्रात हे होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा उपक्रम सुरू केला आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक उमदेवारांना आपले नाव पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविता यावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागपूर शहर काँग्रेसनेही उमदेवारी अर्जांचे वाटप सुरू केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांतून इच्छुक उमेदवारांची नावे मागितली आहेत. त्यासाठी अर्जाचा ‘फॉरमॅट’ तयार करण्यात आला आहे. इच्छुक उमदेवाराच्या वैयक्तिक तपशिलासह पक्षासाठी केलेल्या कामाची यादीच मागविण्यात आली आहे. त्यानुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज नेण्यास सुरुवात केली आहे.

नागपुरातील काँग्रेसच्या देवडिया भवन या शहर काँग्रेस कार्यालयात अनेकांनी हे अर्ज घेतले. बुधवारपर्यंत (ता. 10) नागपुरातून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे आणि त्यांचे अर्ज प्रदेश कार्यालयाला पाठवायचे आहेत. त्यानंतर प्रदेशपातळीवर या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती आहे. या मुलाखतीनंतर प्रदेशपातळीवरून उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदेश काँग्रेसने उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी दिल्यानंतर केंद्रीयस्तरावरून प्रदेशनिहाय लोकसभा मतदारसंघाची उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रदेश काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. देशात काँग्रेस ‘इंडिया’ आघाडीत आहे. महाराष्ट्रात आजच्या घडीला काँग्रेस महाविकास आघाडीतील सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीतून लढणार असली तरी स्वबळाची तयारी काँग्रेसने ठेवली आहे. त्यासाठीच 48 लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची नावे मागविण्यात आली आहे.

महाविकास आघाडीमध्ये अद्याप महाराष्ट्रातील जागावाटपाचा मुद्दा मार्गी लागलेला नाही. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे. अशात पक्षाने नागपुरातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येईल, तसतसे काँग्रेसमधील समीकरण बदलत जाणार आहे. सध्या राज्यभरातून काँग्रेस उमेदवारांच्या नावांचे अर्ज मागवित असली तरी प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी कुणाला ‘लकी ड्रॉ’ लागेल का, याबद्दल ठामपणे कुणालाही ठाऊक नाही.

Edited by : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT