MLA Balwant Wankhade's Car Sarkarnama
विदर्भ

Amravati : आमदाराच्या वाहनामुळे मृत्यू झालेल्याच्या भावाचेही हृदयविकाराने निधन

प्रसन्न जकाते

Daryapur Accident : काँग्रेसचे दर्यापूर येथील आमदार बळवंत वानखडे यांच्या भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेतील मृतकाच्या भावाला हा धक्का असह्य झाला. त्यामुळे त्यांचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दोन तासांच्या फरकाने झालेल्या या घटनेनंतर दोन्ही भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या अपघातप्रकरणी आमदार वानखडे यांच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

अमरावती-दर्यापूर मार्गावरील शुक्रवारी (ता. 22) लखापूर फाट्यावर आमदार वानखडे यांच्या कारने दिलेल्या धडकेत मोहम्मद खालिद मोहम्मद अमजद (वय 63) यांचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या भावाचे निधन झाल्याचे वृत्त कळताच हा धक्का असह्य झाल्याने खालिद यांचे लहान भाऊ जाहेद मोहम्मद अमजद (वय 59) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांचा दोन तासात मृत्यू झाला.

एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने गाव शोकसागरात बुडाले. शनिवारी (ता. 23) दोन्ही भावांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चालक अंकुश नागोराव डोंगरदिवे (वय 26, रा. लेहगाव रेल्वे, ता. दर्यापूर) याला अटक केली आहे. अपघाताचा तपास दर्यापूर पोलिस करत असल्याची माहिती ठाणेदार संतोष ताले यांनी दिली. आमदार वानखडे यांची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

शेतात कापूस वेचणी झाल्यानंतर मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रालीत मजूर कापसाचे गाठोडे ठेवत होते. त्याच वेळी आमदार बळवंत वानखडे यांच्या भरधाव कारने (MH27/CQ2129) ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक दिली. अपघातात शेतमालक तथा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद खालिद यांचा जागीच मृत्यू झाला. सहा शेतमजूर जखमी झालेत. आमदार वानखडे माजी मंत्री आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या वाहनात होते. वानखडेंच्या कारमध्ये चालक व त्यांचे स्वीय सहायक होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अपघातानंतर दर्यापूर पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पंचनामा करून अपघाताला कारणीभूत ठरलेली आमदारांची कार त्याच रात्री ताब्यात घेतली होती. आता आमदारांच्या चालकालाही अटक करण्यात आली आहे. अशात एकाच कुटुंबातील दोन भावांवर एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने काळाने झडप घातल्याने मुस्लिम समाजात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी आमदार वानखडे यांच्या चालकाविरुद्ध कोणती कारवाई होते याकडे अनेकांचे लक्ष आहे. अमरावतीच्या राजकीय वर्तुळातही या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT