Session Court : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतील 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका राणा दाम्पत्याने न्यायालयात दाखल केली होती. सरकारी पक्ष व राणा यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणा यांची विनंती याचिका फेटाळली. त्यामुळे राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करीत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मुंबईच्या खार पोलिसांनी एप्रिल 2022 मध्ये राणा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती. सुमारे 14 दिवस राणा तुरुंगात होते. पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याच्या कारणावरून राणा दाम्पत्यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. एफआयआर दाखल करण्यापूर्वीच आपल्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे नमूद करीत राणा दाम्पत्याने गुन्हाच रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी त्यांचा निकाल राखून ठेवला होता. आता न्यायालयाने हा निकाल दिला आहे. राणा यांच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा रद्द करता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. यापुढील सुनावणीसाठी राणात दाम्पत्याला आता कोर्टापुढे हजर राहावे लागणार आहे. राणा यांनी 'मातोश्री'बाहेर केलेल्या आंदोलनाची दोषारोप निश्चितीही आता करण्यात येणार आहे. आरोपांच्या निश्चितीची प्रक्रिया 5 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होते की काय, अशी चिन्हे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलेच 'टार्गेट' केले होते. तेव्हापासून सुरू असलेले हे राजकीय युद्ध आजतायागायत सुरूच आहे. उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करीत असल्याने रवी राणा आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे राडाही झाला होता. हे प्रकरणही पोलिसांपर्यंत गेले होते. त्यानंतरही राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करणे कायम ठेवले आहे.
सध्या अमरावती येथील हनुमान गढी परिसरात शिव कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराणाचे आयोजन राणा यांनी केले आहे. कथेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातही खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले. हनुमान चालिसा पठण केली म्हणून आम्हाला तुरुंगात टाकणाऱ्या ठाकरे यांनी अमरावतीमध्ये दिवसातून पाच वेळा पठण केली जाणारी हनुमान चालिसा रोखून दाखवावी, असे खासदार राणा म्हणाल्या होत्या.
राणा दाम्पत्य आणि वाद यांचे जुने नाते आहे. यापूर्वी राणा यांचा अमरावतीच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके आणि त्यांचे पती संजय खोडके यांच्याशी असलेला वाद चांगलाच रंगला होता. त्यावेळी खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राणा ज्यावेळी अमरावतीमध्ये नवनीत कौर यांच्याशी विवाहबद्ध झाले, त्यावेळी त्यांनी महासामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या आयोजनात विघ्न आणल्याच्या कारणावरून त्यावेळी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती.
कालांतराने अजित पवार यांच्या माध्यमातूनच आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा या लोकसभा निवडणूक लढवित असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळविला. नवनीत राणा खासदार झाल्यानंतर या दाम्पत्याने भाजपशी जवळीक साधली. अलीकडच्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्याशी त्यांचा मोठा वाद आहे.
अमरावती येथील एका कथित लव्ह जिहादप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात चांगलाच गोंधळ घातला होता. त्यानंतर या प्रकरणातील युवतीने पुढे येत आपल्यासोबत लव्ह जिहादचे प्रकरण घडलेच नव्हते. कौटुंबिक वादातून आपण घर सोडून गेलो होतो, परंतु राणा दाम्पत्यांने आपली प्रचंड बदनामी केल्याचा आरोप केला होता. अमरावती येथे कार्यरत तत्कालीन पोलिस आयुक्त आरती सिंह यांच्यासोबतही राणात दाम्पत्याचा वाद होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.