Ajit Pawar in Nagpur Metro. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : 'जस्ट वाव... लुक’मध्ये अजितदादांची 'मेट्रो राइड'

Ajit Pawar : मनातल्या मनात केली असणार पुणे आणि नागपुरातील सेवेची तुलना

प्रसन्न जकाते

Metro Service : निळ्या रंगांचे चेक्स असलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट... अॅश कलरचा ट्राऊजर.. काळेशार पॉलिश बूट आणि डोळ्यांवर फिक्कट ब्राऊन रंगाचा गॉगल.. अशा भारी ‘लूक्स’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 16) नागपूर मेट्रोची सफारी केली.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सध्या पवार हे नागपूर येथे मुक्कामी आहेत. वेळ काढत त्यांनी शनिवारी ‘मेट्रो राइड’ केली. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जणू काही जादुची काडीच फिरवली अन‌् बघता बघता नागपूर मेंट्राच्या भव्यदिव्यतेचे साऱ्यांचे डोळे दिपले. नागपुरात मेट्रो रूळांवर येत असताना जागतिक पातळीवरचे अनेक विक्रमही प्रस्थापित झालेत. अशातच दादांनाही मेट्रो सफारीचा मोह आवरला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून दादाही नागपूर मेट्रोबद्दल ‘जाम भारी’ चर्चा ऐकून होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात असताना पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राकडंच पूर्ण विकास निधी जातो, अशी नेहमीच ओरड व्हायची. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची ताब्यात येताच ‘मौका पाहून चौका मारला’ आणि मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं विदर्भाच्या पारड्यात पडली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेजारच्या बाकांवर असलेल्या ‘त्या’ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित दादांना भाजपनं निधीच्या विषयावरून अनेकदा लक्ष्य केलं होतं.

महाविकास आघाडीचं सारं काही सुरळीत सुरू असतानाच अचानक शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी भात्यातील ‘बाण’ काढत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिंदे-फडणवीस यांचं सरकार सत्तेवार आलं. सत्तापरिवर्तन होताच पुन्हा नागपूर मेट्रोसह विदर्भातील विकासाच्या ‘समृद्धी’चा महामार्ग प्रशस्त झाला. कालांतराने ‘काकांची’ साथ सोडत पुतण्या अजित दादा यांनी आपल्या राष्ट्रवादीची वेगळी चूल भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत मांडली. सत्तेच्या खुर्च्या बदलल्या पण दादांचं पुणेप्रेम सुटता सुटेना. पालकमंत्री पदावरून मध्यंतरी दादांच्या रूसव्यावरून हेच पुन्हा सिद्ध झालं. अशातच त्यांनी आजच्या घडीला पुण्यापेक्षा सरस असलेल्या नागपूर मेट्रो सफारीचा मुहूर्त साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सीताबर्डी ते खापरी मार्गावरील मेट्रोमधून दादांनी ‘राइड’ घेतली, अगदी रितसर तिकिट काढत. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी, सारंग गडकरी यावेळी त्यांच्या समवेत होते. अधिकारी आणि प्रवाशांशी संवाद साधताना, मेट्रोतून फिरताना दादांचं बारकाईनं निरीक्षण चाललं होतं. मेट्रो प्रकल्पाचे किती मार्ग सुरू झालेत, किती नागपूरकर दररोज प्रवास करतात, किती उत्पन्न मिळते, मेट्रो स्थानकांची भव्यदिव्यता, ट्रॅकवरून दिसणारं आलीशान शहर, त्यातून झालेली रोजगार निर्मिती, सीताबर्डीतील इंटरचेंज स्थानक, सौर ऊर्जेचा वापर, ग्रीन मेट्रोची संकल्पना आदी सारं दादांनी माहिती करून घेतलं. मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी उपराजधानी नागपूर व सध्या पुण्यात असलेल्या सेवेची नक्कीच मनातल्या मनात तुलना केली असणार अशी चर्चा यावेळी होती.

पुणे येथे सध्या तीन वर्षात मेट्रोचे दोन मार्ग कार्यान्वित झाले आहेत. पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्टापर्यंत आणि वनाज ते रुबी हॉल या मार्गावर सध्या सेवा सुरू झालीय. त्या तुलनेत फडणवीस आणि गडकरी यांनी त्यांना मिळालेल्या तीन वर्षाच्या काळात नागपुरात मेट्रोचं जाळं किती झपाट्यानं पसरविलं, हे पाहून नक्कीच दादा थक्क झाले असणार. त्यामुळं शनिवारी दादांच्या मेट्रो सफारीदरम्यान दोनच चर्चा होत्या. एक दादांच्या जबरदस्त लूक्सची आणि दुसरी पुण्याच्या तुलनेत नागपूर मेट्रोच्या सुसाट वेगाची.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT