विदर्भ

Deekshabhoomi Parking Issue : दीक्षाभूमी आंदोलकांवरून राऊतांनी सरकाराला सुनावले

Rajesh Charpe

Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने माजी मंत्री नितीन राऊत यांनी सरकाराला जबाबदार धरले आहे. आम्ही आंदोलन करणारे आहोत, गुन्हेगार नाहीत असे त्यांनी सरकारला सुनावणी गुन्हे परत घेण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आंबेडकरी जनतेच्या असंतोषाची दखल सरकारने आधीच का घेतली नाही अशीही विचारणा केली.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य सरकारने दोनशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून दीक्षाभूमी परिसरात अंडर ग्राउंड पार्किंग करण्यात येत आहे. पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे दीक्षाभूमीवरच्या स्तुपाला धोका असल्याने आंबेडकरी जनतेनी सोमवारी जोरदार आंदोलन केले होते. येथील बांधकाम साहित्य जाळून टाकले तसेच खड्ड्यांच्या सभोवताल लावलेले कठडे पाडले होते.

जनतेचा रोष लक्षात घेत तत्काळ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अंडर ग्राउंडच्या पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. दीक्षाभूमी स्मारक समितीने सुचवल्यानुसारच बांधकाम केले जात आहे. यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे. माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत आंदोलकरांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

दीक्षाभूमी (Dikshabhoomi) येथे पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे स्तूपाला धोका होईल, बोधिवृक्ष अडचणीत येईल त्यामुळे दीक्षाभूमी येथे भीमसैनिकांनी स्वंयस्फूर्तीने आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या शेकडो ज्ञात-अज्ञात आंदोलकांवर बजाजनगर पोलिसांनी दोन गंभीर प्रकाराचे गुन्हे दाखल केले आहे. ज्यावेळी भूमिगत पार्किंग विरोधात नागरिकांमधला रोष समाज माध्यमातून व्यक्त होत होता त्यावेळी पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन काय करीत होते? असा प्रश्न ही डॉ. राऊत (Nitin Raut) यांनी सभागृहात उपस्थित केला.

भीमसैनिक आणि समाजबंधूनी दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगला बऱ्याचदा विरोध दर्शवला आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दीक्षाभूमी परिसरात विकासाच्या योजनेबाबत समाजाशी चर्चा का करण्यात आली नाही असा जाब विचारून यासाठी पोलिस प्रशासन, जिल्हाप्रशासन आणि सोबतच राज्य सरकारही जबाबदार असल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT