crime News Sarkarnama
विदर्भ

Buldhana News: पोलीस ठाण्यासमोरच दोन गट भिडले! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू, 7 जण जखमी

Shiv sena Corporator Killed In Buldhana : देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सात जण जखमी आहेत.

Mangesh Mahale

बुलढाणा: देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीने परिसर हादरला आहे. या घटनेत शिंदेसेनेचे नगरसेवक शेख अनवर शेख अली आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित कार्यकर्ता आरेफ पठाण यांचा मृत्यू झाला आहे. या राड्यात सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच दोन्ही गट आमनेसामने आल्याचे सांगण्यात येत आहे. हाणामारीदरम्यान तलवारी आणि इतर धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकाराची सुरुवात एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी (काल) शहरातील एका परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बसण्याच्या जागेवरून दोन लहान मुलांमध्ये वाद झाला. सुरुवातीला हा प्रकार किरकोळ स्वरूपाचा होता. मात्र, त्यानंतर हा वाद संबंधित कुटुंबीय आणि मोठ्या व्यक्तींमध्ये पोहोचला.

दरम्यान, रात्री झालेल्या या वादाचे पडसाद पुढे उमटले आणि दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष वाढत गेला. हा वाद थेट हिंसक हाणामारीपर्यंत पोहोचला. पोलीस ठाण्याच्या परिसरातच दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाल्याने काही काळ परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली.

या घटनेत शेख अनवर शेख अली आणि आरेफ पठाण यांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी शेख अनवर शेख अली हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक असल्याची माहिती आहे, तर आरेफ पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

हाणामारीत जखमी झालेल्या नागरिकांना सुरुवातीची वैद्यकीय मदत देण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या संघर्षात नेमके किती जण सहभागी होते, हल्ल्यात कोणत्या शस्त्रांचा वापर झाला आणि घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेनंतर देऊळगाव राजा शहरात खबरदारी म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून परिसरावर लक्ष ठेवले जात असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT