Devendra Fadanvis : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपकडून लढणार की अपक्ष लढणार, यावर सध्या खल सुरू आहे. त्या भाजपकडून लढणार असल्याची चर्चा जोरात सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या केंद्रांत आमच्या सोबत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा जे सांगतील, ते आपण करू, असे वक्तव्य खासदार राणा यांनी केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खासदार राणा आमच्या सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे त्या आमच्या सोबत राहतील आणि आज आमच्या व्यासपीठावर त्या आहेत, यात काही नवल नाही, असंही ते म्हणाले. आज (ता. 4) दुपारी नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बनावट कागदपत्रं बनवल्याप्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अटकही करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना यातील सर्व डिटेल्स तुम्हाला लवकरच देऊ. अलीकडच्या काळात काही लोक बनावट गोष्टी करत असल्याचं लक्षात आलं होतं, त्यामुळे दोन तीन ठिकाणी यापूर्वीही आम्ही कारवाई केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भ्रष्टाचारासंदर्भात मग तो कुणीही असो, आमदार किंवा खासदार कुणालाही सोडण्यात येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे, तो योग्यच आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. हे खरं आहे की, भ्रष्टाचाराचा प्रकार असेल तर कोणाला सूट मिळण्याचा प्रश्नच येत नाही. आमदार असो की खासदार त्यांना भ्रष्टाचार करण्याचा परवाना दिला जाऊ शकत नाही. 1998 मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता. त्यामुळे आपला निकाल सुप्रीम कोर्टाने बदलला आहे, याचे आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा एकही उमेदवार घोषित करण्यात आला नाही. यासंदर्भात विचारले असता, जागावाटपासंदर्भात महाराष्ट्राबद्दल चर्चा व्हायची आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत काय ते कळेल. कारण जेव्हा पहिली यादी जाहीर झाली, तेव्हा महाराष्ट्र चर्चेला यायचा होता. पण लवकरच महाराष्ट्राच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर आम्ही यासंदर्भात माहिती देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.