Uddhav Thackeray-Devendra Fadnavis- Bawankule Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis :'फडणवीसांना संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील', बावनकुळेंची टीका !

Rajesh Charpe

Nagpur News : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपविण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला.अनेक षडयंत्र रचली होती.जंगजंग पछाडले, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. फडणवीस यांना संपविण्यासाठी तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युतर दिले.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 'एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहील. तुमची गुर्मीच उतरवतो' असे आव्हान शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता दिले होते. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी 'एक्स'वरून प्रत्त्युतर दिले आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी जनता आहे. त्यांचे राजकारण संपविणे सोपे नाही. त्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील. उद्धव ठाकरे यांचा अहंकार जनता जनार्दन उतरविल्याशिवाय राहणार नाही,असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही. उद्धव ठाकरे यांनीच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पाठीत खंजीर खुपसला.भाजपसोबत विधानसभेत लढले. नंतर महाविकास आघाडीत गेले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्री होण्याची संधी चालून येताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला.तो फसल्याने आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा ठाकरे करीत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावे, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मुस्लिम (Muslim) आणि ख्रिश्चन समाजाच्या मतांवर उद्धव ठाकरे हे फडणवीस यांना पाहून घेऊ अशी भाषा करीत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची ही भाषा ऐकली असती तर त्यांना काय वाटले असते, असा सवाल देखील भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विचारला आहे. ठाकरे यांचे वक्तव्य अहंकाराचे असल्याची टीका देखील त्यांनी केली.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT