Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fandnavis : ''अरे गजानन महाराजांसमोर तरी...'' ; फडणवीसांनी 'त्या' प्रश्नावर भाष्यच टाळलं!

जयेश विनायकराव गावंडे

Shegaon News : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळे अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदारासंह नेते मंडळी नागपुरात मुक्कामी थांबलेली आहे. अशावेळी मंत्र्यांचे विदर्भातील विविध भागांमध्ये दौरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

या वेळी प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना नवाब मलिक(Nawab Malik) संदर्भात प्रश्न विचारले, तेव्हा फडणवीसांनी ''आपण गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात उभे आहोत. आपण आता वेगळ्या विषयांवर बोलू. महाराजांसमोर राजकीय विषयावर चर्चा नको, असे स्पष्टपणे नमूद करीत कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंदिर परिसरात राजकीय प्रश्न नको म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या विषयावर बोलणे टाळले. राजकारणावर बोलण्याचे टाळत त्यांनी संभाव्य राजकीय वादंग टाळण्याचे चातुर्य दाखविल्याची चर्चा सुरू होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेगाव येथे आयोजित अधिवक्ता परिषदेला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले होते. मात्र, त्यांनी राजकीय विषयांवर बोलणे टाळले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जमीन आर्थिक गैरव्यवहार आणि देशद्रोह्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाप्रकरणी वैद्यकीय जामिनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार(Ajit Pawar) गटाचे समर्थक आमदार नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करून घेण्यास गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनामध्ये अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली.

या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अशात नवाब मलिक यांना विरोध करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेगावात याच मुद्द्यावरून बोलणे टाळत पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिल्याचे दिसून आले.

फडणवीस म्हणाले की, ''शेगावात येण्याची संधी मिळाली ही आनंदाची बाब आहे. शेगाव व शिर्डीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गजानन महाराज व साईबाबा यांनी गरिबांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे. त्यांची ही शिकवण महत्वाची आहे.'' त्यांचे हे बोलणे संपताच त्यांना माध्यमांनी वादग्रस्त नवाब मलिक प्रकरणावर प्रश्न विचारले. मात्र फडणवीस यांनी त्यावर बोलणं टाळलं.

फडणवीस यांनी दिलेले पत्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मौन यांवर प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले, मंदिर परिसरात राजकीय प्रश्न नको. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र यांचा श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व महाप्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच संस्थानतर्फे उपमुख्यमंत्र्यांचे औक्षण करण्यात आले. विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले पाटील, जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT