Nagpur Winter Session : सत्ताधारी-विरोधक हे दोघेही जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढताहेत...

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आलेली ही मरगळ सोमवारच्या कामकाजात तरी झटकली जाणार का?
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील विविध भागात नुकताच झालेला अवकाळी पाऊस गारपीट आणि त्यातून झालेले शेतमालाचे नुकसान, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. अशा संकटसमयी सरकारकडून तातडीने दिलासा मिळावा? अशी अपेक्षा असते. त्यातच विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असेल तर मदतीची अपेक्षा अधिकच वाढते. मात्र, 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यातील दोन दिवसांत तरी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी एकही घोषणा झालेली नाही.

मुळात नागपुरातील हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून घ्यावे, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली होती. मात्र, ती फेटाळत नियोजित म्हणजेच सात तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात झाली. गुरुवार, शुक्रवारी अशा दोन दिवसांत गोंधळ, निदर्शने, घोषणाबाजी आणि ज्या मुद्द्यांचा थेट जनतेशी कुठलाही संबंध नाही, अशा विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी समन्वयाने अर्ध्या दिवसातच सभागृहाचे कामकाज बंद पाडले. (Nagpur Winter Session)

Nagpur Winter Session
Winter Session Nagpur: यासाठी थोरातांनी केले सावेंचे तोंड भरून कौतुक; फडणवीसही झाले अवाक्

या दोन दिवसांत वैद्यकीय उपचारांसाठी जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी विधिमंडळ अधिवेशनाला लावलेली हजेरी आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही सुरू झालेली लुटुपुटुची लढाई मनोरंजन करणारी ठरली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या विधानाने सत्ताधारी भाजपच्या आमदारांना आयते कोलीतच मिळाले.

विधान भवनाच्या पायऱ्यावर निदर्शने करताना भाजपने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळातील सत्ताधारी आणि विरोधकांचे आंदोलन, निदर्शने घोषणाबाजी हे नाटकी आणि ठरवून केल्यासारखे वाटत होते. एका बाजूने विरोधी पक्षाचे नेते, आमदार गळ्यात मोसंबी, कापसाचे बोंड घालून निदर्शने करत होते, तर दुसरीकडे अगदी हाकेच्या अंतरावर सत्ताधारी पक्षाचे आमदार सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधकांना जाब विचारत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे आणि ठरल्यानुसार सभागृहाचे कामकाज दुपारीच संपले. दुसऱ्या दिवशी थोडावेळ जास्त पण तेही सर्वांच्या सोयीनुसार शनिवार, रविवारची सुट्टी पाहून आमदार मंत्र्यांना आपापल्या मतदारसंघात जाता यावे, अशा दृष्टीने संपवण्यात आले. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील हे पहिले दोन दिवस अक्षरशः पाण्यात गेले, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

शेती, पाणी, वीज यासह जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित अशा कुठल्याही विषयावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा झाली नाही. विरोधकांनी मी मारल्यासारखे करतो आणि सत्ताधाऱ्यांनी रडल्यासारखं करायचं अशा पद्धतीने हे दोन दिवस पार पडले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर लाखो रुपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते.

Nagpur Winter Session
Lok Sabha Election : भाजपची डेंजर झोनमधील जागा; माजी राज्यमंत्र्याची निवडणूक लढवण्याची तयारी

माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अधिवेशनाच्या कामकाजात हजेरी लावणे आणि त्या मुद्द्यावरून मूळ प्रश्नांना बगल देत सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळणे हे सर्व स्क्रिप्टेड तर नाही ना? अशी चर्चा होताना दिसते. नवाब मलिक यांच्या विषयावरून सभागृहाचे कामकाज सलग दोन दिवस प्रभावित झाले. विधिमंडळ अधिवेशन काळातच दाऊद इब्राहिम, इकबाल मिर्ची आणि त्यांचे राजकारण्यांशी संबंध समोर कसे येतात? असा प्रश्नही उपस्थित होतो.

राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा (Maratha Vs OBC) असा संघर्ष पेटलेला आहे. महिनाभरापूर्वी या संघर्षाची चटके सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनाही बसले. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांत तरी अवाक्षर काढण्यात आलेले नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे झालेले नुकसान हा मुद्दा विरोधकांनी केवळ निदर्शने करून हाताळल्याचा आव आणला. त्यामुळे शनिवार, रविवारची सुट्टी संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आलेली ही मरगळ सोमवारच्या कामकाजात तरी झटकली जाणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Nagpur Winter Session
Sangali Political News : राष्ट्रवादीचे 'नाईक' आणि भाजपचे 'देशमुख' यांच्यात 'कलगीतुरा'...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com